वर्षाला सत्तर लाख पगार देऊनही मिळेनात ट्रक ड्रायव्हर

भारतात उच्च शिक्षित इंजीनीअर्स, डॉक्टर्सना वर्षाला जेवढा पगार मिळतो त्यापेक्षाही अधिक पगार देण्याची तयारी दाखवून सुद्धा ब्रिटन मध्ये लॉजिस्टिक कंपन्यांना ड्राईव्हर्स मिळत नसल्याचे समजते. सुपरमार्केट ट्रक ड्रायव्हर्सची ब्रिटन मध्ये भयानक टंचाई जाणवते आहे परिणामी टेस्को, सेन्सबरी सारख्या मोठ्या कंपन्या ट्रक ड्रायव्हर भरती करताना वर्षाला ७० हजार पौंड म्हणजे ७०,८८,५१५ रुपये वार्षिक पगार आणि वर्षाला दोन लाखापेक्ष अधिक बोनस देण्याची तयारी दाखवत आहेत.

ब्रिटन मध्ये सध्या सुपरमार्केट साठी वाहतूक करणाऱ्या १ लाख ड्रायव्हर्सची गरज आहे. अनुभवी ड्रायव्हर्सना सुपरमार्केटमध्ये माल पोहोचविण्याची सेवा देण्या बदल्यात लाखो रुपये देण्याची तयारी दाखवून सुद्धा पुरेसे ड्रायव्हर मिळत नाहीत. याचा विपरीत परिणाम ग्राहकांना भोगावा लागणार आहे. कारण सुपरमार्केट मध्ये माल पुरेसा नसेल तर वस्तूंची टंचाई निर्माण होऊन किमती वाढणार आहेत.

१७ वर्षे अनुभव असलेल्या एका ड्रायव्हरने दिलेल्या माहितीनुसार पाच दिवसांच्या कामासाठी वर्षाला ७०००० पौड पगार, शनिवारी काम केल्यास दीडपट तर रविवारीही काम केल्यास दुप्पट मेहनताना देण्याची तयारी कंपन्या दाखवीत आहेत. या व्यवसायात इतका पगार हे आश्चर्य आहे. दोन वर्षाचा करार केला तर दोन हजार पौंड म्हणजे २ लाखापेक्षा अधिक बोनस देण्याचीही कंपन्यांची तयारी आहे. पण तरीही ड्रायव्हर्स उपलब्ध होऊ शकलेले नाहीत.