पासवर्ड लक्षात ठेवण्यापासून मिळणार मुक्ती

इंटरनेटचा वापर वाढत चालला तसे डिजिटल पासवर्ड कोणत्याही व्यवहारासाठी आवश्यक झाले आणि त्यामुळे हॅकिंग सारखे प्रकार वारंवार घडू लागले आहेत. पासवर्ड सोपा ठेवावा तर सहज हॅक होण्याची भीती आणि अवघड ठेवावा तर विसरण्याची भीती अश्या दुहेरी कात्रीत सापडलेल्या इंटरनेट युजर्स साठी कंपन्या पासवर्डलेस भविष्याविषयी विचार करू लागल्या आहेत. त्यादृष्टीने अनेक महत्वाची पावले टाकली जात आहेत. मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्या त्यांच्या विविध सेवेसाठी वेगवेगळा पासवर्ड नको यासाठी सुविधा देत आहेत.

त्यासाठी ऑथेंटीकेटर अॅप, विंडोजचे हॅलो फिचर, सिक्युरिटी की, किंवा एसएमएस, ई मेलवर मिळणारे व्हेरीफीकेशन कोड वापरले जात आहेत. आपला पासवर्ड दीर्घकाळ हॅक होऊ नये असे वाटत असले तर किमान १२ डिजीजचा आणि अवघड पासवर्ड हवा असा सल्ला तज्ञ देतात. पण असे पासवर्ड लक्षात ठेवणे अत्यंत जिकीरीचे होते हा अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळे हे पासवर्ड कुठेतरी लिहून ठेवणे किंवा अन्यत्र सेव्ह करून ठेवणे भाग पडते.

आकडेवारी सांगते, जगात आत्तापर्यंत ३० हजार कोटीपेक्षा जास्त पासवर्ड क्रिएट केले गेले आहेत. त्यातील ७० टक्के, हॅकर्स काही सेकंदात भेदू शकतात. सात कॅरेक्टर चा पासवर्ड भेदायला हॅकर्सना १ सेकंड पुरते, ९ कॅरेक्टर साठी पाच दिवस आणि त्यापेक्षा अधिक कॅरेक्टरचे पासवर्ड भेदायला जास्तीत जास्त ४ महिने लागतात.

परिणामी आता आय स्कॅनिंग, फेस रेकग्निशन, फिंगर प्रिंट यांचा वापर वाढत चालला आहे. पण मजा अशी की जेव्हा पासवर्डची कोणतीच भानगड नव्हती तेव्हा सुद्धा, बँक, रेशन, जमिनी व्यवहार यासाठी बोटाचे ठसे घेतले जातच होते. आता ते डिजिटल स्वरुपात आले आहेत.