पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तू, तुम्हीही करू शकता खरेदी

पंतप्रधानांना वेळोवेळी मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसापासून सुरु झाला असून तो ७ ऑक्टोबर पर्यंत सुरु राहणार आहे. या ई लिलावात पंतप्रधानांना मिळालेल्या अनेक भेटवस्तू, स्मृतीचिन्हे, पेंटिंग, फोटो, आणि शाली, पगड्या अश्या कपड्यांचा समावेश आहे. विक्रीतून जमा होणारी रक्कम ‘नमामि गंगे’ योजनेसाठी खर्च होणार आहे. भेट मिळालेल्या वस्तूंचा लिलाव करून त्यातून मिळालेली रक्कम समाजकार्यासाठी वापरण्याची सुरवात मोदी यांनीच केली असून अशी योजना राबविणारे ते पाहिले पंतप्रधान आणि राजकीय नेते आहेत. २०१५ मध्ये या प्रकारे भेट वस्तूंचा प्रथमच लिलाव केला गेला होता.

या ई लिलावात टोक्यो ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंनी पंतप्रधानांना दिलेल्या क्रीडा वस्तू, राममंदिर प्रतिकृती, चारधाम, रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर मॉडेल, मूर्ती, पेंटींग्सचा समावेश आहे. भालाफेक प्रकारात सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राने मोदींना भेट दिलेला भाला, सुवर्णपदक विजेत्या सुमित अंतील याने वापरलेला भाला असून याची बेस किंमत १ कोटी रुपये आहे.

टोक्यो ऑलिम्पिक मधील बॉक्सिंग पदक विजेती लवलीनाचे तिची सही असलेले ग्लव्हज, पॅरालीम्पिक गोल्ड पदक विजेत्या कृष्ण नागर याची सही असलेली बॅडमिंटन रॅकेट, टेबलटेनिस ची रजतपदक विजेत्या भावना पटेलची सही असलेली रॅकेट यांचाही यात समावेश आहे. सर्वात कमी रक्कम एका सजविलेल्या छोट्या हत्तीसाठी असून त्याची बेस किंमत २०० रुपये आहे. इच्छुक खरेदीदार संबंधित वेबसाईट वरून वस्तूंची खरेदी करू शकणार आहे. लिलावात १३३० वस्तू आहेत.