पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी देशातील एक कोटीहून अधिक नागरिकांचे एकाच दिवसात लसीकरण


नवी दिल्ली : देशातील कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असतानाच तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच देशातील लसीकरण माहिमेने गती घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी आज एकाच दिवसात देशातील एक कोटीहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून हा एक जागतिक विक्रम ठरला आहे. देशात सध्या जगातील सर्वात मोठा लसीकरणाचा कार्यक्रम सुरु असून आतापर्यंत चार वेळा 1 कोटीपेक्षा नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

देशाने आज कोरोना लसीकरण मोहीमेचा नवा रेकॉर्ड रचला गेला आहे. देशात आज दुपारी तीन वाजेपर्यंत दीड कोटी नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा विक्रम नोंदवण्यात आला आहे. या अगोदर 27 ऑगस्टला 1.03 कोटी नागरिकांना डोस देण्यात आले. तसेच 31 ऑगस्टला 1.33 कोटी नागरिकांना डोस देण्यात आले. त्याचबरोबर 6 सप्टेंबर 1.13 कोटी नागरिकांना लस देण्यात आली आहे. तर आज 17 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी दीड कोटीपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. आजच्या दिवशी दोन कोटी नागरिकांना लस देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

दरम्यान देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार अद्याप सुरुच आहे. आज आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 34,403 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 320 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 37, 950 बाधित उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.