रवी शास्त्री, भरत अरुण, आर श्रीधर यांना यामुळे मिळाले नाही ‘fit to fly’ सर्टिफिकेट


लंडन – इंग्लंड विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेच्या चौथ्या कसोटी दरम्यान टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण व क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांनाही कोरोना झाल्याचे समोर आले. त्यानंतर शास्त्रींसह सपोर्ट स्टाफ सदस्यही विलगीकरणात गेले. पण, अजूनही ही तिघे इंग्लंडमध्येच अडकली आहेत. त्यांना अद्यापही ‘fit to fly’ सर्टिफिकेट मिळालेले नाही.

इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्यासाठी टीम इंडियाचे इतर सदस्य यूएईत दाखल झाले आहेत, परंतु शास्त्री, अरूण व श्रीधर हे अद्यापही इंग्लंडमध्येच अडकले आहेत. या सर्वांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे आणि त्यांनी १० दिवसांचा विलगीकरण कालावधीही पूर्ण केला आहे. त्यांना यूएईसाठी विमानात बसण्यासाठी ”फिट टू फ्लाय’ टेस्ट द्यावी लागेल आणि त्यात पास झाल्यावरच त्यांना इंग्लंड सोडता येईल.

रवी शास्त्री, भरत अरुण आणि आर श्रीधऱ हे कोरोनामुक्त झाले आहेत आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहेत. त्यांनी विलगीकरण कालावधी पूर्ण केला आहे. पण, नियमाचा भाग म्हणून त्यांना ३८ CT गुण मिळवावे लागतील आणि त्यानंतरच त्यांना फिट टू फ्लाय सर्टिफिकेट दिला जाईल. येत्या दोन दिवसांत ते लंडनहून विमानात बसतील अशी खात्री असल्याचे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितले.