अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जोमाने कामे करुन जनतेपर्यंत सेवा-सुविधा पोहोचवाव्यात – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे


मुंबई : पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोग लागू करण्यात आला असून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिक जोमाने काम करुन जनतेपर्यंत सेवा-सुविधा पोहोचवाव्यात, असे आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले.

पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांना 7 वा वेतन आयोग लागू करण्याबाबत दूरदृष्य प्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ, नगरविकास विभागाचे सचिव महेश पाठक, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी व महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या, नगरविकास मंत्री शिंदे हे विविध विषयांवर काळजीपूर्वक दखल घेत असतात. पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांना 7 वा वेतन आयोग लागू होत आहे. पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कोविड काळातील भत्ता न घेता आपली सेवा चोखपणे बजावली आहे, असेही डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.