आयकर विभागाच्या हाती लागले सोनू सुदने ‘टॅक्सचोरी’ केल्याचे पुरावे?


मुंबई – सलग तिसऱ्या दिवशी अभिनेता सोनू सूदच्या घराच्या परिसराची आयकर विभागाकडून तपासणी केली जात आहे. मोठ्याप्रमाणात करचोरीचे पुरावे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना आढळल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आयकर विभागाच्या हाती चित्रपटांमधून मिळालेला पैसा आणि खासगी गुंतवणुकीसंदर्भात करचोरी करण्यात आल्याचे पुरावे लागल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान सूद चॅरिटी फाऊण्डेशनची खाती आणि आर्थिक व्यवहारही तपासेल जाणार आहे. आज सायंकाळी आयकर विभागाकडून यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सोनू सूदच्या घरी आयकर विभागाचे अधिकारी मागील तीन दिवसांपासून तपास करत आहेत. सोनू सूदचा अकाऊंटंट हा शहरामध्ये नसल्यामुळे त्याला आयकर विभागाला तातडीने माहिती देता आली नसल्याचे समजते. सोनूच्या घरी आयकर विभागाने बुधवारीच तपास सुरु केला आहे. आयकर विभागाने सोनूशी संबंधित सहा ठिकाणांवर तपास केला असून ही ठिकाणे मुंबई आणि लखनऊमध्ये आहेत.

आयकर विभागाकडून तपास केला जात असला तरी ही धाडी टाकण्यासारखी कारवाई नसून कागदोपत्री पडताळणी केली जात आहे. सोनू सूदने करचोरी केल्यासंदर्भात हा तपास केला जात असल्याचे पीटीआयने आपल्या वृत्तात म्हटले आहे. सोनूने एका संपत्तीसंदर्भात केलेल्या व्यवहाराचीही तपासणी आयकर विभागाकडून केली जात असल्याचे न्यूज १८ ने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

सोनू सूद यापूर्वीही कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकला होता. मुंबई महानगरपालिकेने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केलेली. सोनूने जुहूमधील आपल्या सहा मजली घरामध्येच परवानग्यांची पूर्तता न करता हॉटेल सुरु केल्याचा आरोप करण्यात आलेला. या प्रकरणामध्ये महानगरपालिकेने पाठवलेल्या नोटीस विरोधात सोनू सूदने याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने सोनू सूदची याचिका फेटाळून लावल्यानंतर सोनूने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

आयकर विभाग सोनू सूद आणि लखनऊ बेस्ट रिअल इस्टेट फर्म यांच्यात झालेला कराराबाबत तपास करत आहे. या करारात करचुकवेगिरीच्या आरोपानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या तपासाला ‘सर्वे’ म्हटले जात आहे. याशिवाय, सोनू सूदबाबत सुरु असलेल्या तपासाला राजकीय रंगही दिला जात आहे. अलिकडे सोनू सूद दिल्ली सरकारच्या एका प्रकल्पाचा ब्रँड अॅम्बेसेडर बनला आहे.

आयकर विभागाचे अधिकारी सर्वात प्रथम बुधवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास सोनू सूदच्या कार्यालयात पोहोचले होते. त्याच्या कार्यालयातील कोणतीही कागदपत्रे वा अन्य गोष्टी अधिकाऱ्यांकडून जप्त करण्यात आलेले नाही. सोनू सूदशी संबंधित अन्य सहा कंपन्यांचीही विभागाकडून पाहणी करण्यात आली आहे. सोनू सूदवर सुरू झालेली आयकर विभागाची कारवाई ही राजकीय सूडबुध्दीने केली जात असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.