विसर्जनाच्या दिवशी पुणे शहर आणि परिसरातील सर्व दुकाने बंद राहणार


पुणे : कोरोनाचे सावट वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्यनगरीतील गणेशोत्सवावर असून उत्सवासाठी पोलिसांकडून नियमावली लागू करण्यात आली आहे. घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांनी खरेदीसाठी गर्दी करू नये, रस्ते, पदपथांवर मूर्ती विक्री स्टॉल लावू नयेत, तसेच प्रतिष्ठापना आणि विसर्जन सोहळ्यासाठी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांना यंदाही परवानगी देण्यात येणार नाही, आदीचा समावेश असलेली नियमावली पोलिसांनी तयार केली आहे.

तर पुणे, पिंपरी चिंचवड आणि कॅन्टोनमेंट परिसरातील सर्वच्या सर्व दुकाने अनंत चतुर्दशी म्हणजे गणपती विसर्जनाच्या दिवशी बंद राहणार असल्याची घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केली आहे. हा निर्णय जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांनी मिळून घेतला असल्याचेही पवार यांनी सांगितले.

१० सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाचा प्रारंभ झाला. प्रतिष्ठापना सोहळा तसेच विसर्जन सोहळ्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकींना यंदा परवानगी नसल्याचे सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी नियमावलीत नमूद केले आहे.