राज्यपालांच्या त्या वर्तणुकीवर अजित पवार म्हणाले…


पुणे – आज पुण्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमादरम्यान उपस्थिती दर्शवली. यावेळी सत्कार करत असताना त्यांनी चक्क स्टेजवरच एका महिलेचा मास्क खेचला. त्यांच्या या कृतीमुळे उपस्थितांमध्ये हशा तर पिकलाच पण या घटनेची मोठी चर्चाही होऊ लागली आहे. पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याच घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार यांनी पुण्यातल्या कोरोना आढावा बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी यावेळी जिल्ह्यातील नव्या योजनांची घोषणाही केली. तसेच कोश्यारी यांच्या या कृतीबद्दल प्रतिक्रियाही दिली. पवार म्हणाले, राज्यपाल महामहिम आहेत. त्यांनी काही केले तर त्यावर मी बोलू शकत नाही. त्यांनी शपथ देताना आम्हाला मास्क काढायला सांगितला, तर काढावाच लागेल.

कोथरुड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बालगंधर्व मंदिर येथील झाशीचा राणी पुतळा या दरम्यान पुणे ऑन पेडल्स सायकल रॅलीचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सायकल रॅलीला झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. पण एका महिला सायकल पटूचा राज्यपाल यांच्या हस्ते त्या कार्यक्रमाप्रसंगी सत्कार करण्यात आला. त्यावेळी फोटो काढत असताना, राज्यपालांनी त्या महिलेच्या तोंडावरचा चक्क मास्क स्वतःच्या हाताने काढला.

उपस्थितांमध्ये यावेळी एकच हशा पिकला. तर दुसऱ्या बाजूला केंद्र आणि राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केलेले असताना. थेट राज्यपालांनी एका महिलेचा मास्क खाली घेतल्यामुळे एकच चर्चा रंगली आहे.