दीड कोटी नागरिकांना एका दिवसात लस देऊन साजरा होणार मोदींचा वाढदिवस

भाजपने पंतप्रधान मोदींचा ७१ वा वाढदिवस देशातील दीड कोटी नागरिकांना कोविड १९ प्रतिबंधक लस देऊन साजरा करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठीची तयारी पूर्ण झाली असून जनतेने त्यासाठी मदत करावी असे आवाहन केले गेले आहे. हा दिवस करोना लसीकरण मोहिमेत मैलाचा दगड ठरावा यासाठी भाजप स्वास्थ्य स्वयंसेवक, अधिकाधिक नागरीकांनी कोविड १९ लस घ्यावी यासाठी प्रयत्नशील आहेत.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले, एका दिवसात १ कोटी पेक्षा अधिक नागरिकांना लस देण्याचे रेकॉर्ड देशाने केले आहे पण भाजपने दीड कोटी लसीकरणाचे ध्येय ठेवले आहे. लसीकरण इतिहासात याची नोंद व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पंतप्रधान मोदींचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला जाईल. पंतप्रधान देशातील जनतेसाठी अहोरात्र काम करत आहेत आणि जनतेच्या सुरक्षेला त्यांनी सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. सध्याच्या काळात अधिकाधिक जनतेचे लसीकरण हे जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने अधिक महत्वाचे आहे.

आपण देशवासियांना कोविड पासून वाचविण्यास सक्षम आहोत. पंतप्रधानांनी करोनापासून जनतेचा बचाव व्हावा यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यामुळे एका दिवसात अधिकाधिक लसीकरण करणे हा त्यांचा सन्मान ठरेलच पण ज्यांनी लसविरोधात जनतेमध्ये भ्रम निर्माण केला त्यांनाही त्यातून उत्तर मिळेल. सुदैवाने आपल्याकडे पुरेशी लस उपलब्ध आहे.

देशात बुधवार पर्यंत ७६ कोटी हून अधिक नागरिकांना कोविड १९ लस दिली गेली आहे.