राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे तालिबानी पोशाखातील बिलबोर्ड झळकले

अफगाणिस्थान मधून अमेरिकी सैन्य काढून घेतल्याच्या राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या निर्णयावरून जगभरातील अनेक देश प्रतिकूल प्रतिक्रिया देत असतानाच अमेरिकन नागरिक सुद्धा बायडेन यांच्या विरोधात बोलू लागले आहेत. बायडेन यांच्या या निर्णयाबद्दल त्यांना दोष दिला जात आहे आणि बायडेन यांच्या विरोधात एक अभियान सुरु झाले आहे.

द सनच्या रिपोर्ट नुसार पेनसिल्वानियाचे माजी सिनेटर स्कॉट वॅगनर यांनी हे अभियान सुरु केले आहे. अफगाणिस्थानातून अमेरिकी सैन्य काढून घेतल्याने तालिबान्यांचा मार्ग मोकळा झाला आणि त्याचा त्रास अफगाणी जनतेला भोगावा लागत असल्याची टीका सुरु झाली आहे. या विरुद्ध सुरु झालेल्या अभियानात बायडेन यांचे तालिबानी वेशातील आणि हातात रॉकेट लाँचर घेतलेले बिलबोर्ड जागोजागी लावण्यात येत आहेत. त्यावर ‘ मेकिंग द तालिबान ग्रेट अगेन’ असा मजकूरही आहे. हे अभियान दोन महिने चालविले जाणार असून त्यात देशात जागोजागी असे बिलबोर्ड लावले जाणार आहेत.

वॅगनर यांच्या मते अफगाणिस्थान मधून अमेरिकी सैन्य काढून घेण्याच्या बायडेन यांच्या निर्णयामुळे जगात अमेरिकेला नामुष्की पत्करावी लागली. अमेरिकेला लज्जेने मान खाली घालावी लागली आणि देशाची साऱ्या जगाने टर उडवली. तालिबानने उघड उघड अमेरिकेला अफगाणिस्थान बाहेर हुसकू अशी घोषणा केली होती. आमच्या राष्ट्राध्यक्षांच्या सैन्य माघारीच्या निर्णयामुळे ते शक्य झाले. यामुळे अफगाणी नागरिकांचे स्वातंत्र लोपले आहेच पण अमेरिका जगात हास्यास्पद ठरली आहे.