काय सांगते पंतप्रधान मोदींची सही?

१७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ७१ वा वाढदिवस साजरा करत आहेत. अर्थात आजच्या दिवशी पंतप्रधानांचा कोणताही खास कार्यक्रम नाही तर रोजच्या प्रमाणेच ते दिवसभर कामात व्यग्र राहणार आहेत. मोदी त्यांच्या कामाच्या झपाट्याबद्दल जितके चर्चेत असतात, तितकेच त्यांच्या फॅशन स्टाईल बद्दलही असतात. त्यांचे कुर्ते, जॅकेट्स, दाढी, गमछे भल्या भल्या, देशीच नव्हे तर विदेशी नेत्यांना सुद्धा आकर्षित करतात. पंतप्रधान मोदींची सही सुद्धा अशीच हटके आहे. हस्ताक्षरावरून माणसाची पारख करणाऱ्या तज्ञांचे मोदींच्या सही बद्दलचे विश्लेषण काय सांगते हे जाणून घेणे अनेकांना आवडेल.

मोदींच्या इंग्रजी आणि हिंदी अश्या दोन्ही सह्यांचे विश्लेषण अनेकांनी केले आहे. मोदींच्या इंग्रजी सही मध्ये शेवटी दोन डॉट आहेत. मोदींना त्यांच्या निर्णयात दुसऱ्याचा हस्तक्षेप किंवा लुडबुड रुचत नाही याचे ते प्रतिक आहे. एकूण सही वरून त्यांना संवाद साधणे आवडते असे दिसते. नोटाबंदी, जीएसटी, सर्जिकल स्ट्राईक ही मोदीच्या दृढ निर्णयाची उदाहरणे म्हणता येतील असे या तज्ञांना वाटते.

मोदी बहुतेक वेळा हिंदी मध्ये सही करतात. त्यांच्या सहीचे सहज विश्लेषण शक्य नाही असेही काही जणांचे मत आहे. मात्र मोदी यांच्या हिंदी सहीवरून त्यांना ‘चलता है’ वृत्ती पसंत नाही. त्यांच्या सहीतील पहिले ‘न’ अक्षर मोठे आहे. दृढ निश्चय, असा त्याचा अर्थ आहे. करिश्माई लोकांच्या सही मध्ये असा प्रकार दिसतो, मग ते जगावर प्रभाव टाकणारे नेते असोत, खेळाडू असोत, सेलेब्रिटी असोत अथवा कलाकार असोत. मोदी यांचे नाव आडनावापेक्षा मोठे आहे. याचा अर्थ कुटुंबाच्या प्रतिष्ठेवर ते अवलंबून नाहीत तर स्वतःच्या कामामुळे ओळख मिळविणारे आहेत.

सहीतील शेवटच्या अक्षराचा जोर खालच्या बाजूने आहे म्हणजे त्यांना त्यांच्या ध्येयापासून कुणी परावृत्त करू शकत नाही. सही सरळ रेषेत पण शेवटी वरच्या बाजूला जाणारी आहे. याचा अर्थ यश आणि भविष्याबद्दल आशादायी स्वभाव असा लावला जातो.