चारधाम यात्रेवरील स्थगिती उत्तराखंड उच्च न्यायालयाने उठवली


डेहरादून – बऱ्याच दिवसांपासून चार धामच्या दर्शनाची वाट पाहणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उत्तराखंडमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित चारधाम यात्रेवरील बंदी उच्च न्यायालयाने उठवली आहे. उच्च न्यायालयात गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान, उच्च न्यायालयाने यात्रा बंदीचा २८ जूनचा निर्णय मागे घेतला आहे. कोरोना नियमांचे पालन करत न्यायालयाने चारधाम यात्रा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

सरकारच्या वतीने अँडव्हकेट जनरल गुरुवारी झालेल्या सुनावणी दरम्यान म्हणाले की, कोरोना प्रादुर्भाव आता नियंत्रणात आहे. अशा परिस्थितीत यात्रा बंदीचा निर्णय मागे घेतला पाहिजे. सरकार यात्रेकरुसाठी नवीन नियम जारी करेल. निकाल देतांना न्यायालयाने सांगितले की, केदारनाथ धाममध्ये ८००, बद्रीनाथ धाममध्ये १२००, गंगोत्रीमध्ये ६०० आणि यमुनोत्रीमध्ये ४०० यात्रेकरूंना परवानगी असेल. तसेच यात्रेकरु कोणत्याही तलावात स्नान करू शकणार नाहीत. त्याचबरोबर न्यायालयाने प्रत्येक भक्त किंवा प्रवाशाला कोरोना निगेटीव्ह अहवाल आणि लसींचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवण्यास सांगितले आहे.