माजी मंत्री म्हणून नका दोन-तीन दिवसात कळेल; चंद्रकांत पाटलांचे खळबळजनक वक्तव्य


पुणे – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा पुण्यातील गुरुवारी एका कार्यक्रमात उल्लेख माजी मंत्री म्हणून करण्यात आला. चंद्रकांत पाटील यांनी त्यानंतर माझा उल्लेख माजी मंत्री म्हणून करु नका, असे म्हटले आहे. सर्वांच्याच भुवया चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे उंचावल्या आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे राज्यात पुन्हा भाजप सरकार येणार की दुसरा काही मोठा राजकीय भूकंप होणार अशी चर्चा देखील रंगू लागली आहे.

माजी मंत्री म्हणून नका दोन-तीन दिवसात कळेल या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. चंद्रकांत पाटील पुण्यातील देहूगाव येथे एका खासगी दुकानाच्या उद्घाटना प्रसंगी आले होते, तेव्हा त्यांनी हे सूचक वक्तव्य केले आहे. सूत्र संचालन करणाऱ्या व्यक्तीने उद्घाटन करण्याच्या अगोदर माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उदघाटन होत असल्याचे म्हटले, तसेच वारंवार तसाच उल्लेख केला. त्यानंतर उद्घाटनासाठी रिबीन कापणार त्याच वेळी चंद्रकांत पाटील यांनी हे सूचक वक्तव्य करत माजी मंत्री म्हणून नका दोन-तीन दिवसात कळेल असे म्हटले आहे.

राज्यातील राजकीय वर्तुळात चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे विविध तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. दरम्यान, त्यांनी केलेल्या सूचक वक्तव्याचा नेमका अर्थ काय आहे हे येणाऱ्या दोन-तीन दिवसात कळेल. तसेच विरोधक देखील त्यांच्या सूचक वक्तव्याकडे कसे पाहतात, हे देखील पाहावे लागणार आहे.

दरम्यान, भाजपशी युती हाच पर्याय असा लेख संभाजी ब्रिगेडच्या पुरुषोत्तम खेडेकर यांनी लिहिल्यामुळे राज्याच्या राजकारणात आणखी काही वेगळं समीकरण पाहायला मिळणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. अशाप्रकारचा प्रस्ताव पुरुषोत्तम खेडेकर यांच्याकडून आलेला नाही. त्यांचा प्रस्ताव आल्यानंतर आमची कोअर कमिटी निर्णय घेईल. असा काही प्रस्ताव असेल, तर तो राज्याच्या प्रदेशाध्यक्षांकडेच यायला हवा. आमचा पक्ष हा जगभर पसरलेला आहे. देशातील १२ राज्यांमध्ये आमचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे एवढ्या सहजपणे हे निर्णय होत नाहीत. त्याची मोठी प्रक्रिया असते, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.