अभिनेता साहिल खानच्या त्रासाला कंटाळून ‘मिस्टर इंडिया’ मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न


मुंबई : ‘मिस्टर इंडिया’ पुरस्कार विजेता आणि भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवर बॉडीबिल्डिंगच्या अनेक स्पर्धांमध्ये प्रतिनिधीत्व केलेल्या मनोज पाटीलने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्याच्यावर सध्या कूपर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी मनोज पाटीलने एक सुसाईड नोट लिहिली असून त्यामध्ये अभिनेता साहिल खान आपल्या आत्महत्येला जबाबदार असेल, असा उल्लेख केला आहे. ठाण्यातील ओशिवरा पोलीस स्टेशनच्या नावे मनोज पाटीलने ही सुसाईड नोट लिहिली असून त्यामधून साहिल खानला योग्य ती शिक्षा मिळावी, अशी मागणी केली आहे.

बुधवारी रात्री मिस्टर इंडिया मनोज पाटील याने विषारी गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. रात्री उशिरा कुटुंबियांनी त्याला कूपर रुग्णालयात दाखल केले. सध्या मनोजची तब्येत स्थिर असल्याची सुत्रांची माहिती. पुढील उपचारांसाठी त्याला कूपर रुग्णालयातच ठेवण्यात येणार आहे.

साहिल खान गेल्या काही दिवसांपासून आपल्याला आणि आपल्या न्युट्रिशन शॉपला विनाकारण टारगेट करत असून त्याचा आपल्याला मानसिक त्रास झाल्याचे मनोज पाटीलने आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. आपल्या व आपल्या पत्नीमधील असलेल्या वादाचा फायदा घेऊन तिच्या मदतीने आपल्याला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचे कारस्थान साहिल खान करत असल्याचे मनोज पाटीलने म्हटल्यामुळे आपला अमेरिकेला जायचा व्हिसा रद्द होऊ शकेल, असेही त्याने म्हटले आहे. आपल्या कुटुंबियांना या सर्व गोष्टींचा त्रास होत असून साहिल खानवर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती मनोज पाटीलने पोलिसांना केली आहे.