माजी आयएएस अधिकाऱ्याच्या घर, कार्यालयावर ‘ईडी’चा छापा


नवी दिल्ली – गुरूवारी नवी दिल्लीत सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आणि कार्यकर्ते हर्ष मंदर यांच्या घर व कार्यालयावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापेमारी केली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पत्नीसह मंदर हे जर्मनीला रवाना झाल्याच्या काही तासानंतर ही छापेमारी करण्यात आली.

आज सकाळी आठ वाजता वसंत कुंज येथील त्यांच्या निवासस्थानी आणि अधचिनीमधील सेंटर फॉर इक्विटी स्टडीज येथील त्यांच्या कार्यलयात ही छापेमारी सुरू झाली. याशिवाय सुत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार ईडीने मंदर हे महरौलीमध्ये चालवत असलेल्या एका बाल गृहावर देखील छापा मारला होता.

बर्लिनमध्ये रॉबर्ट बॉश अकादमी येथे फेलेशिपसाठी गुरूवारी पहाटे मंदर हे जर्मनीला रवाना झाले. ते सेंटर फॉर इक्विटी स्टडीजचे संचालक म्हणून कार्य करत आहेत. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने(एनसीपीसीआर) जुलै महिन्यात दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितले होते की, मंदर यांच्याशी निगडित असलेल्या दोन बाल गृहांच्या विरोधात विविध बाबींचे उल्लंघन आणि विसंगती आढळल्यानंतर कारवाईच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. न्यायालयाला एनसीपीसीआरने दिलेल्या जबाबात नमूद केलेल्या उल्लंघनांपैकी एक म्हणजे त्यांना मुलांनी जंतर-मंतरसह निषेध स्थळांवर नेण्यात आल्याची माहिती दिली. एनसीपीसीआरच्या तपासणी अहवालाला रद्द करण्यासाठी सेंटर फॉर इक्विटी स्टडीज (सीईएस) द्वारे चालवल्या जाणाऱ्या दोन बाल गृहांनी दाखल केलेल्या याचिकेच्या उत्तरात हे उत्तर सादर करण्यात आले होते.