महिलांचे प्रेरणास्थान बनली सिक्किम कन्या इक्षा केरुंग

सिक्किम या सुंदर राज्यातील इक्षा हेंग सुब्बा उर्फ इक्षा केरुंग हिने महिलांना काहीच अशक्य नाही याचे एक भक्कम उदाहरण जगासमोर ठेवले आहे. इक्षा सिक्किममधली पोलीस अधिकारी आहे, राष्ट्रीय पातळीवरील मुष्टियोद्धा आहे, उत्तम बाईक रायडर आहे आणि सुपर मॉडेल पण आहे. टीव्ही रियालिटी शो एमटीव्ही सुपर मॉडेल ऑफ इअर सिझन दोन मध्ये इक्षाने टॉप ९ प्रतिस्पर्ध्यात जागा मिळविली आहे. आता सुपर मॉडेलचा खिताब ती मिळवेल का याची उत्सुकता सर्वाना लागून राहिली आहे.

इक्षा २०१९ साली पोलीस विभागात भरती झाली आणि आज ती पोलीस अधिकारी म्हणून काम करते आहे. तिला मॉडेलिंगची आवड आहे. तिने जेव्हा स्वतःचा परिचय शो मध्ये करून दिला तेव्हा शो पॅनलिस्ट मलाईका अरोरा हिने अश्या महिलांना सॅल्युट करण्याची गरज आहे असे म्हणून स्टँडिंग ओवेशन दिले.

इक्षाला तिच्या कामाविषयी प्रेम आणि अभिमान आहे. पोलीस विभागात दाखल होण्यापूर्वी ती राष्ट्रीय पातळीवरची बॉक्सर होती आणि ती चांगली बायकर आहे. सुपरमॉडेल बनण्याचे तिचे स्वप्न आहे. महिला कम्फर्ट झोन मधून बाहेर पडून विविध क्षेत्रात नशीब आजमावू शकतात यांची ती प्रेरणा बनली आहे.