भारत-चीन सीमा रस्ते प्रमुखपदी प्रथमच महिला मेजर आईना राणा

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजे बीआरओच्या रस्ते बांधणी विभागात भारत चीन सीमा रस्ता जबाबदारी मेजर आईना राणा या महिला सेना अधिकाऱ्याकडे सोपविली गेली आहे. भारतीय सेनेत ९ वर्षे कार्यरत असलेल्या मेजर राणा हिमालय क्षेत्रातील सीमा रोडची जबाबदारी पेलणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. यापूर्वी या पोस्टवर फक्त पुरुष अधिकारी नेमले जात होते.

याविषयी बोलताना मेजर राणा म्हणाल्या, हे दुहेरी आव्हान आहे आणि माझ्यासाठी नवा अनुभव. त्यांचे पोस्टिंग उत्तराखंड जोशी मठ जवळच्या पिपलाकोटी येथे असून त्यांचे युनिट बद्रीनाथ मंदिराच्या मागे असलेल्या भारताची सीमा माना या ठिकाणी आहे. १५ दिवसापूर्वी मेजर राणा येथे जॉईन झाल्या आहेत. मेजर राणा यांची बीआरओ मधली ही पहिलीच पोस्टिंग आहे. यापूर्वी त्या आर्मी मध्ये होत्या.

मेजर राणा सांगतात, आरसीसी प्रमुखपद हे आत्तापर्यंत पुरुष अधिकाऱ्यांनीच भूषविले आहे. या भागात दर सिझन मध्ये रस्ते खराब होतात. भूस्खलन, पाउस आणि नैसर्गिक संकटे यामुळे ७५ टक्के रस्ते वाहून जातात. ऑक्टोबर मध्ये बर्फवर्षावामुळे खराब परिस्थिती असते. इंडो चायना बॉर्डर १४ हजार फुट उंचीवर आहे. त्यामुळे रस्ते देखभाल हे मोठे आव्हान आहे. तसेच या विभागातील मजूर ते अधिकारी सर्वानी आजपर्यंत पुरुष अधिकाऱ्याच्या हाताखाली काम केले आहे आणि प्रथमच त्यांनाही महिला अधिकाऱ्याच्या हाताखाली काम करावे लागणार आहे.

अर्थात सेनेमध्ये काम करताना नवीन आव्हान रोजच स्वीकारावे लागते त्यामुळे माझी त्यासाठी पुरेपूर तयारी आहे. लहानपणापासून भारतीय सेनेत जाण्याचे स्वप्न होते ते पूर्ण झाले आहे.