राज कुंद्रा विरोधात १४६७ पानी आरोप पत्र दाखल

मुंबई गुन्हा अन्वेषण पोलिसांनी बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा नवरा आणि उद्योगपती राज कुंद्रा याच्या विरोधात पोर्न फिल्म प्रकरणी १४६७ पानी आरोपपत्र दाखल केले आहे. मंगळवारी हे आरोपपत्र राज आणि त्याचा मित्र रेयॉन थोर्प याच्या विरोधात दाखल करण्यात आले. अन्य ११ आरोपींच्या विरोधात ३५२९ पानी आरोपपत्र १ एप्रिल २०२१ रोजी दाखल केले गेले होते.

मुंबई पोलिसांनी या संदर्भात काढलेल्या पत्रकात राज कुंद्राने चित्रपटात काम मिळविण्यासाठी स्ट्रगल करत असलेल्या तरुण मुलींच्या आर्थिक गरजांचा फायदा घेऊन त्यांना अश्लील चित्रपटांची लालूच दाखविली. पोर्न फिल्म बनवून नंतर सब्स्क्रीशनच्या माध्यमातून विविध वेबसाईट आणि ओटीटीवर दाखवून प्रचंड कमाई केली. राज विरुद्ध काही व्हॉटस अप, ई मेल व काही टेक्निकल पुरावे जमा झाले आहेत. पुरावे नष्ट करण्याचाही त्याच्यावर आरोप आहे.

राज आणि रेयॉन यांना १९ जुलै रोजी अटक झाली होती आणि त्यांची घरे,कार्यालयांवर छापे घातले गेले होते. राज कुंद्राचे नाव प्रथम घेणारा उमेश कामत याच्याकडे हॉटशॉट अॅप, पोर्न फिल्म अपलोड करण्याचे काम होते असेही समजते.