राकेश टिकैत यांनी असदुद्दीन ओवैसी यांचा केला भाजपचे ‘चाचाजान’ असा उल्लेख


नवी दिल्ली – ‘अब्बा जान’ नंतर आता ‘चाचाजान’ची एंट्री उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ च्या निमित्ताने सुरु झालेल्या राजकीय रणसंग्रामात झाली आहे. कारण, आता एआयएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्यावर बागपतमध्ये दाखल झालेल्या भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) नेते राकेश टिकैत यांनी जोरदार निशाणा साधला आहे. राकेश टिकैत यांनी यावेळी, ओवैसी यांचा उल्लेख भाजपचे ‘चाचाजान’ असा केला आहे. आता उत्तर प्रदेशात भाजपचे ‘चाचाजान’ ओवेसी आले आहेत. तेच भाजपला विजयाकडे घेऊन जातील. आता काहीच अडचण नसल्याचा टोला यावेळी राकेश टिकैत यांनी लगावला आहे.

उत्तर प्रदेशात भाजपचे चाचाजान असदुद्दीन ओवेसी दाखल झाले आहेत. त्यामुळे ओवेसींनी भाजपवर अत्यंत कठोर शब्दांत जरी टीका केली, तरीही ओवेसींवर कोणताही गुन्हा दाखल केला जाणार नाही. कारण, ते दोघेही एकच टीम असल्याची थेट टीका राकेश टिकैत यांनी यावेळी केली आहे. मंगळवारी (१४ सप्टेंबर) बागपतच्या टटीरी गावात शेतकऱ्यांना भेटण्यासाठी राकेश टिकैत हे आले होते. यावेळी टिकैत यांनी ओवैसी आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

यावेळी विजेचे दर आणि एमएसपीसंदर्भात (MSP) निवेदनही शेतकऱ्यांना भेटण्यासाठी आलेल्या राकेश टिकैत यांनी दिले. यावेळी टिकैत म्हणाले की, देशातील सर्वात महाग वीज यूपीमध्येच आहे. टिकैत पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी योग्य हमीभाव मिळत नाही. उसासाठी किमान आधारभूत किंमत ही ६५० रुपये प्रति क्विंटल असायला हवी.

राकेश टिकैत म्हणाले की, तिन्ही कृषी कायदे केंद्र सरकारने मागे घ्यावेत आणि एमएसपीची हमी द्यावी, यासाठी आम्ही दिल्लीत धरणे धरून बसलो आहोत. आता हे देखील त्यात समोर येत आहे की, MSP मध्ये मोठा घोटाळा होत आहे. सरकार, अधिकारी आणि व्यापाऱ्यांच्या मदतीने धान्य आणि गव्हाच्या शासकीय खरेदीमध्ये प्रति क्विंटल ४०० ते ५०० रुपयांचा फरक आहे. रामपूरमध्ये ११ हजार बनावट शेतकऱ्यांनी हे धान्य खरेदी करून पुढे ते काही व्यापाऱ्यांना विकले आहे.