‘इन्फोसिस’वर ‘पांचजन्य’मधून करण्यात आलेल्या टीकेवरुन रघुराम राजन यांचा सवाल


नवी दिल्ली – तुम्ही केंद्र सरकारला कोरोना लसीकरणाच्या बाबतीत सुरुवातीच्या काळामध्ये केलेल्या वाईट कामागिरीसाठी देशविरोधी म्हणणार का? असा थेट सवाल आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मंगळवारी उपस्थित केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थक मुखपत्र असणाऱ्या ‘पांचजन्य’मधून भारतामधील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असणाऱ्या ‘इन्फोसिस’वर करण्यात आलेल्या टीकेसंदर्भात राजन बोलत होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थक ‘पांचजन्य’ या साप्ताहिकामध्ये ‘इन्फोसिस’ कंपनीच्या माध्यमातून एखादी देशविरोधी शक्ती देशाच्या आर्थिक हिताविरोधात तर काम करीत नाही ना, अशी शंका व्यक्त करण्यात आली होती. ही टीका वस्तू व सेवाकर (जीएसटी) आणि प्राप्ती कर पोर्टलमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणींच्या अनुषंगाने करण्यात आली होती. सरकार किंवा सरकारच्या जवळच्या व्यक्तींकडून मागील काही काळामध्ये अनेक खासगी कंपन्यांवर किंवा त्यांच्याशी संबंधित व्यक्तींवर बेछूट आरोप करण्यात आल्याचे प्रकार घडले असून ‘इन्फोसिस’ हे त्यामधील ताजे उदाहरण आहे.

हे वक्तव्य काहीच कामाचे नसल्याचे मला वाटते. तुम्ही कोरोना लसीकरणाच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये चांगलं काम न करणाऱ्या सरकारला दोष देत देशविरोधी म्हणणार का? तुम्ही त्याचा चूक म्हणता आणि लोक चुका करत असतात, असे मत राजन यांनी व्यक्त केले. जीएसटी हे त्याचे उदाहरण असल्याचेही राजन यांनी म्हटले. मला जीएसटीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय फार योग्य वाटला नाही. अजूनही चांगल्या पद्धतीने ते करता आले असते. पण या चुकांमधून शिकले पाहिजे. त्यांचा वापर तुमचे जुने हेवे दावे काढण्यासाठी होता कामा नये, असा टोला एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना राजन यांनी लगावला.