गणेशोत्सवानंतर मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होण्याचा धोका, महापालिकेकडून चिंता व्यक्त


मुंबई : गणेशोत्सवानंतर मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ शकते, अशी शक्यता बृह्नमुंबई महानगरपालिकेने व्यक्त केली आहे. तसेच तिच परिस्थिती या महिन्यातील आकडेवारीही सांगत आहे. ऑगस्ट महिन्यात मुंबईत दररोज 200 ते 300 कोरोना रुग्णांची नोंद केली जात होती. पण हाच आकडा सप्टेंबर महिन्यात 350 ते 400 पर्यंत पोहोचला आहे. अशातच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून कोरोना नियमांचे पालन होत नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

विशेषतः अनेक नागरिक आरतीच्या वेळी एकत्र येतात आणि मास्कशिवाय आरतीसाठी सहभागी होत आहेत. त्यामुळे गेल्यावर्षी प्रमाणेच यंदाही गणेशोत्सवानंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होणार असल्याचे, पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मुंबईत गेल्या वर्षी याच महिन्यातील चित्र अत्यंत भयावह होते. गेल्या वर्षी याच महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव सुरु झाला होता. अशातच दुसऱ्या लाटेदरम्यान, मुंबईत सर्वाधिक रुग्णसंख्या ही गणेशोत्सव आणि गणेशोत्सवाच्या नंतरच्या काळात पाहायला मिळाली होती. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवावर मुंबई महापालिका बारकाईने लक्ष ठेवून आहे.

आकडेवारीवर नजर टाकली, तर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला 400 ते 450 कोरोनाबाधितांची नोंद होत होती. ही रुग्णसंख्या आता गेल्या काही दिवसांपासून जवळपास 350 ते 360 रुग्णांवर पोहचली आहे. पण गणेशोत्सवाच्या काळात वाढलेली गर्दी आणि कोरोना नियमांचे उल्लंघन यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या वाढण्या मागील सर्वात मोठे कारण म्हणजे, बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये जमा होणारी गर्दी. कोरोना नियमांचे पालन याठिकाणी होत आहे का? याकडे पालिका प्रशासन लक्ष ठेवून आहे. तरी नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने वारंवार केले जात आहे. अशातच विसर्जन मिरवणूकींचे काय करायचे? हा प्रश्न सध्या महापालिकेसमोर आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात कोरोनाचा आकडा वाढू नये आणि तिसऱ्या लाटेला निमंत्रण मिळू नये, यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील आहे.

दरम्यान मागील 24 तासात मुंबईत 367 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 408 बाधितांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. आतापर्यंत मुंबईत 7,12,570 नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर गेल्या 24 तासात मुंबईत पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या मुंबईत 4696 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1286 दिवसांवर गेला आहे.