या सुंदर देशात नावालाही नाहीत मुंग्या

मुंगी हा अहोरात्र कष्ट करणारा कीटक जगाच्या पाठीवर कुठेही असणारच असा तुमचा समज असेल तर मग त्यात बदल करावा लागेल. घरे, जमिनी, शेते अगदी पाण्यात सुद्धा मुंग्या सापडतात. एखादा अन्नाचा बारीकसा कण जरी पडला तरी काही वेळात त्याभोवती मुंग्याचा गराडा पडतो हा आपला नित्याचा अनुभव आहे. आकडेवारी सांगते, जगात १४ हजाराहून अधिक मुंग्यांच्या प्रजाती आहेत. त्यात लाल आणि काळ्या मुंग्या अधिक आहेत.

पृथ्वीच्या पाठीवर असा एक सुंदर देश आहे ज्याचे पर्यटकांना खूप आकर्षण वाटते. या देशात माणसे आहेत, पर्यटक येतात मात्र येथे शोधूनही मुंग्या सापडत नाहीत. या देशाचे नाव आहे ग्रीनलंड. हे पृथ्वीवरचे सर्वात मोठे बेट म्हणून प्रसिद्ध आहे. उत्तर धृवावर असलेल्या या बेटावरचे हवामान अतिशय थंड असल्याने तेथे मुंग्या राहू शकत नाहीत. येथे मुंग्यांच्या वाढीसाठी खाद्य शृंखला नाही आणि त्यामुळे त्या, या भागात जिवंत राहू शकत नाहीत. दक्षिण ध्रुवावरील अंटार्टीका येथेही असेच हवामान असल्याने तेथेही मुंग्या नाहीत.

ग्रीनलंड हा अतिशय सुंदर देश वर्षाचा बहुतेक काळ बर्फाने झाकलेला असतो. हा उत्तर अमेरिकेचा भाग आहे. हा देश पर्यटकांचे मोठे आकर्षण आहे. २० लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या या देशात खडक आणि बर्फच अधिक आहे. १८ व्या शतकानंतर युरोप शी या देशाचा संबंध आला. हा स्वशासित देश आहे मात्र वरच्या बाजूला कॅनडाच्या आर्क्टिक बेट समूहात पूर्वेला असलेल्या ग्रीनलंड वर डेन्मार्कचा ताबा आहे.