करीना नाही, कंगना साकारणार ‘सीता’

चार वेळा राष्ट्रीय पारितोषिक मिळविलेली बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौतच्या खात्यात आणखी एक मोठा चित्रपट आला आहे. करीना कपूरने सीता साकारण्यासाठी १२ कोटी रुपये मागितल्याची चर्चा झाली असतानाच ही भूमिका करीना नाही तर कंगना साकारत असल्याची घोषणा दिग्दर्शक अलौकिक देसाई यांनी सोशल मीडियावर केली आहे. कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकौंट वरूनही याची पुष्टी केली आहे.

‘सीता, एक अवतार’ या नावाने येणाऱ्या या चित्रपटाची कथा विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिली आहे. विशेष म्हणजे त्यांनी पूर्वीच सीतेच्या भूमिकेसाठी कंगना ही त्यांची पहिली पसंती असल्याचा खुलासा केला होता. या चित्रपटामुळे पौराणिक कथांकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन अमुलाग्र बदलेल असा त्यांचा दावा आहे. करीना सीता साकारणार अशी बातमी आली होती तेव्हाच अनेकानी अगोदरपासून विरोध दर्शविला होता आणि हा हिंदू धर्म व सीतेचा अपमान असेल असे मत व्यक्त केले होते.

सीतेवर आणखीही काही चित्रपट बनत आहेत. आदिपुरुष या भगवान राम यांच्यावर बनत असलेल्या चित्रपटात कृती सेनन सीता साकारत आहे. यात रामाची भूमिका प्रभास तर लंकेश रावणाची भूमिका सैफ अली खान करणार आहेत.