नवी दिल्ली – मागील दीड वर्षापासून आपल्यापैकी अनेकांचे आयुष्य कोरोनामुळे पूर्णपणे बदलून गेले आहे. कोरोना विरोधातील लढाईत मास्कचा वापर, सोशल डिस्टंसिंग आणि हात स्वच्छ धुणे या गोष्टीं सातत्याने पाळण्याचा सल्ला देण्यात येत असल्यामुळे या सर्व गोष्टी आता आपल्या जीवनाचा एक भाग बनल्या आहेत. देशातील नागरिक कोरोना प्रतिबंधक लस घेऊन स्वतःचे रक्षण करत आहेत. पण लसीकरणानंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व गोष्टींचे काटेकोर पालन करण्याचा सल्ला तज्ञांमार्फत देण्यात येत आहे. त्यामुळे आता मास्कपासून कधी सुटका होणार असा प्रश्न देशातील नागरिकांकडून वारंवार विचारला जात आहे. मास्कशिवाय ते कधी फिरू शकतील, हे देशातील नागरिकांना जाणून घ्यायचे आहे. दरम्यान आता या प्रश्नाचे उत्तर नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिले आहे.
मास्कपासून कधी होणार सुटका? निती आयोगाच्या सदस्यांनी दिले उत्तर
व्ही. के. पॉल यांच्यामते, कोरोनाविरोधातील लढाईत लस, औषध आणि कोरोना निर्बंधाचे योग्य पालन करणे आवश्यक आहे. कोरोनाचा जर पराभव करायचा असेल, तर या सर्व गोष्टी एकत्र पाळाव्या लागतील, त्यामुळे पुढच्या वर्षापर्यंत देशातील नागरिकांना मास्कचा वापर करावा लागेल. पॉल यांनी आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर इशारा दिला आहे आणि म्हटले आहे की तिसऱ्या लाटेची शक्यता अद्याप टळलेली नाही, पुढील काळ धोकादायक आहे. डॉ. व्ही. के. पॉल यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सध्यातरी मास्कपासून सुटका होणार नाही. आपल्याला पुढील वर्षातही मास्क घालणे सुरू ठेवावे लागेल, असे म्हटले आहे.
पॉल यांनी भारतात कोरोनाची तिसरी लाट येईल का? याबाबतही भाष्य केले आहे. हे नाकारता येणार नाही. पुढील चार-पाच महिन्यांत लसीकरणामुळे हर्ड इम्युनिटी तयार होऊ शकते. महामारीपासून वाचण्यासाठी आपल्याला स्वतःला तयार करावे लागेल आणि मला वाटते की जर आपण एकत्र आलो, तर ते शक्य होईल, असे डॉ. पॉल यांनी म्हटले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने कोव्हॅक्सिनला मंजुरी देण्याच्या स्थितीचा संदर्भातही पॉल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारतात विकसित झालेल्या कोरोना प्रतिबंधक लसींबाबत जागतिक आरोग्य संघटना यासाठी सकारात्मक प्रतिसाद देईल आणि तेही या महिन्याच्या अखेरीस, असे देखील पॉल यांनी म्हटले.