अफगाणिस्तानात ढवळाढवळ करणाऱ्या पाकिस्तानला अमेरिकेने भारताचा उल्लेख करत दिला इशारा


वॉशिंग्टन – तालिबान्यांना केलेली मदत आणि अफगाणिस्तानसंदर्भात घेतलेली भूमिका आता पाकिस्तानला महागात पडण्याचे चित्र सध्या दिसत आहेत. कारण पाकिस्तानसोबतच्या संबंधांवर विचार केला जाणार असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. केवळ आपल्याच नाही तर भारताकडून अफगाणिस्तानसंदर्भात केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमध्ये अडथळा आणणारी पाकिस्तानची भूमिका असेल तर ‘बघून घेऊ’ अशी भूमिका अमेरिकेच्या स्टेट सेक्रेटींनी व्यक्त केली आहे. पाकिस्तानचा अफगाणिस्तानमधील हस्तक्षेप मागील काही काळापासून वाढल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने थेट पाकिस्तानचा उल्लेख करत जशास तसे उत्तर मिळेल, असा सूचक इशारा पाकिस्तानला आणि पर्यायाने सत्ताधारी इम्रान खान सरकारला दिला आहे.

तसेच मागील २० वर्षांमध्ये पाकिस्तानने अफगाणिस्तानसंदर्भात घेतलेल्या भूमिकेनुसार त्यांनी अफगाणिस्तानच्या भविष्याबद्दल सातत्याने दावे केल्याचे दिसून आले. तालिबान्यांना त्यांनी आश्रय दिला, ज्यामध्ये हक्कांनी समुहातील तालिबान्यांचाही समावेश होता, असे अमेरिकन स्टेट सेक्रेट्री अँथनी ब्लिंकेन यांनी म्हटले आहे.

अशी भूमिका पाकिस्तानने घेण्यामागे त्यांचे काही विशिष्ट हेतू असतील आणि त्यापैकी काही अफगाणिस्तानसंदर्भातील आमच्या तसेच भारत अफगाणिस्तानमध्ये बजावत असणाऱ्या भूमिकेविरोधात जाणारे असतील, तर त्याकडे आम्ही नक्कीच कटाक्षाने लक्ष देणार असल्याचेही अमेरिकने थेट शब्दात सांगितले आहे.

अमेरिकेने एवढ्यावरच न थांबता थेट पाकिस्तानला अफगाणिस्तानसंदर्भातील भूमिकेची किंमत चुकवावी लागणार असल्याचे संकेत दिले आहेत. अमेरिका पुढील काही आठवड्यांमध्ये पाकिस्तानसोबत असणाऱ्या संबंधांबद्दल विचार विनिमय करणार असल्याचे ब्लिंकेन म्हणाल्याचे रॉयटर्सने दिलेल्या आपल्या वृत्तात म्हटले आहे. वॉशिंग्टन अफगाणिस्तानच्या भविष्यासंदर्भात काय भूमिका घेणार आहे, हे येत्या काही महिन्यांमध्ये स्पष्ट होईल, असे ब्लिंकेन यांनी म्हटले आहे.

मागील काही आठवड्यांमध्ये पाकिस्तानने पंजशीरमध्ये केलेले ड्रोन हल्ले, सत्ता स्थापना यासारख्या गोष्टींच्या माध्यमातून अफगाणिस्तानमध्ये बरीच लुडबूड केल्याचे दिसून आले आहे. काही आठवड्यांपूर्वी पाकिस्तानी गुप्तचर संघटना असणाऱ्या आयएसआयचे प्रमुख हामिद फैज यांनी केलेल्या काबूल दौऱ्यामध्येच सरकारच्या बांधणीसंदर्भात सुरुवातीचे काम झाल्याची माहितीही समोर आली होती. तालिबानने सध्या पाकिस्तानच्या मदतीनेच हंगामी नेतृत्व हसन अखुंदकडे दिल्याचे सांगितले जात आहे. फैज यांनी हक्कानीला सरकारची मोट बांधण्यासाठी मदत केल्याचे सांगण्यात येते. हक्कानी नेटवर्कला आयएसआयने सुरक्षा पुरवल्याचे सांगितले जाते. हक्कानी हा अलकायदाशी संबंध असणारा गट आहे. हक्कानी गटाला संयुक्त राष्ट्रांबरोबरच अमेरिकेनेही दहशतवादी गट म्हणून जाहीर केले आहे.