16 सप्टेंबरला राष्ट्रवादीत प्रवेश करणार लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर


पुणे – लवकरच लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर राजकारणात प्रवेश करणार आहेत. सुरेखा पुणेकर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 16 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. सुरेखा पुणेकर यांच्यासोबतच अन्य 16 कलाकारही मनगटावर राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातावर बांधणार आहेत.

सुरेखा पुणेकर यांनी काही दिवसांपूर्वी विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाकडून बिलोली विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. त्याचबरोबर त्या एका मेळाव्यात शिवसंग्रामच्या व्यासपीठावरही बसल्या होत्या. दरम्यान, याआधीही प्रिया बेर्डे, विजय भाटकर, आनंद शिंदे यांच्यासह अनेक कलाकारांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.

सुरेखा पुणेकर गेल्या अनेक महिन्यांपासून राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यांनी स्वतः जुलै महिन्यात विधानसभेची निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.

सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी प्रवेशाबाबत बोलताना म्हणाल्या की, येत्या 16 सप्टेंबरला मी चित्रपट, साहित्य, कला, सांस्कृतिक विभाग मुंबई अध्यक्ष मनोज शंकर व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. आतापर्यंत मी कलेची सेवा केली. आता मला राजकारणातून जनतेची सेवा करायची आहे. महिलांचे, गोरगरिबांचे प्रश्न सोडवायेच आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 16 सप्टेंबरला मला प्रवेश करायचा आहे.