क्रिकेटच्या सर्व प्रकारातून लसिथ मलिंगाची निवृत्ती


कोलंबो – क्रिकेटला श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने अलविदा म्हटले आहे. मंगळवारी सोशल मीडियावर मलिंगाने निवृत्तीची घोषणा केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आधीच अलविदा म्हणणारा मलिंगा आता लीग क्रिकेट खेळणार नाही. ट्वीट करून मलिंगाने म्हटले, आता क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटला मी निरोप देत आहे. माझ्या प्रवासात ज्यांनी मला साथ दिली त्यांचे आभार. आता मी येत्या काही वर्षांमध्ये माझे अनुभव युवा क्रिकेटपटूंसोबत शेअर करेन.

आता लवकरच कोचिंगच्या भूमिकेत मलिंगा येणार आहे. गेल्या वर्षापासून मलिंगा टी-२० क्रिकेटपासून दूर आहे. आयपीएल २०२० मधून त्याने आपले नावही मागे घेतले होते. मलिंगा टी-२० मधील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. त्याची टी-२० कारकीर्द अतुलनीय होती. मलिंगा जगभरातील २९ संघांचा भाग होता. आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा खेळाडू होता. या महान गोलंदाजाने २९५ टी-२० सामन्यांमध्ये ३९० विकेट्स घेतल्या. मलिंगाचा इकॉनॉमी रेट फक्त ७.०७ होता.

आपल्या क्रिकेट कारकिर्दीत लसिथ मलिंगाने अनेक टप्पे गाठले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मलिंगाने पाच वेळा हॅट्ट्रिक घेतली, तर सलग ४ विकेट घेण्याचा पराक्रम त्याने दोनदा केला आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० विकेट घेणारा मलिंगा पहिला गोलंदाज आहे आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन हॅट्ट्रिक घेणारा तो एकमेव गोलंदाज आहे. गोलंदाजीशिवाय मलिंगाने फलंदाजीत २०१०मध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. मलिंगाने अँजेलो मॅथ्यूजसोबत ९व्या विकेटसाठी १३२ धावांची भागीदारी रचली, जो अजूनही एक विश्वविक्रम आहे.