सहकाऱ्यांना कोरोनाची लागण; सेल्फ आयसोलेट झाले रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन


मॉस्को – चीनच्या वुहानमधून सुरु झालेल्या कोरोना संकटामुळे विकसनशील देशांसोबत विकसित देशांचीही परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे अनेक देशांना लॉकडाऊनसारखा कठोर निर्णय घ्यावा लागला. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन सेल्फ आयसोलेट झाले आहेत. कोरोनाची लागण पुतिन यांच्या काही सहकाऱ्यांना झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. स्पुटनिक व्ही लसीचे दोन्ही डोस पुतिन यांनी घेतलेले आहेत.

कोरोना व्हायरसपासून रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांना दूर ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्या प्रकृतीकडे डॉक्टरांची एक टीम लक्ष ठेवून असते. त्याचबरोबर त्यांची भेट घेणाऱ्यांनाही क्वारंटाइन केले जात आहे. क्वारंटाइनचा अवधी पूर्ण केल्याशिवाय राष्ट्रपती पुतिन यांना कुणीही भेटू शकत नाही. पण एवढे असूनही त्यांच्या सहकाऱ्यांना कोरोना झाल्यामुळे पुतिन यांनी आयसोलेट होण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यांनी खबरदारी म्हणून स्वत:ला आयसोलेट केले आहे. ते पूर्णपणे निरोगी आहेत. त्यांना कोरोनाची लागण झालेली नाही. तर पुतिन या ताझिकिस्तानला नियोजित कार्यक्रमासाठी जाणार होते. पण त्यांनी आता न जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ते बैठकीत सहभागी होतील, असे क्रेमलिनने सांगितले. सीरियाचे राष्ट्रपती बशर अल-असद यांची शुक्रवारी भेट घेतल्यानंतर पुतिन यांनी डॉक्टरांशी सल्ला मसलत केली आणि आयसोलेट होण्याचा निर्णय घेतला.