नवी दिल्ली – ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅप झोमॅटोचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव गुप्ता यांनी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकांना त्यांच्या या निर्णयामुळे आश्चर्याचा धक्का बसला आहे. ई-किराणा व्यवसायातून बाहेर पडण्याची घोषणा कंपनीने केल्यानंतर त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. फूड डिलिव्हरीसह किराणा मालाची विक्रीही झोमॅटोने सुरु केली होती. झोमॅटोने नुकताच किराणा मालाची डिलिव्हरी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. गौरव गुप्ता झोमॅटोचे पुरवठा प्रमुख होते.
सहसंस्थापक गौरव गुप्ता यांचा झोमॅटो सोडण्याचा निर्णय
एक मेल पाठवत कंपनी सोडत असल्याचे गौरव गुप्ता यांनी जाहीर केल्याचे मनीकंट्रोलने आपल्या वृत्तात म्हटले आहे. कंपनीत सहा वर्षे टॉप एक्झिक्युटिव्ह म्हणून घालवल्यानंतर आता एक नवीन अध्याय सुरु करणार असल्याचे त्यांनी आपल्या मेलमध्ये नमूद केले होते. झोमॅटोच्या प्रेमात मी आहे आणि नेहमीच राहणार आहे. येथे सहा वर्षापूर्वी येताना पुढे काय होईल हे देखील माहिती नव्हते. आतापर्यंतचा प्रवास खरंच आश्चर्यकारक होता आणि मला याचा अभिमान वाटतो, असे गुप्ता यांनी सांगितले आहे. माझ्या आयुष्यातील एका नवीन वळणावर मी आहे. एक नवीन अध्याय मी सुरु करत आहे. गेल्या ६ वर्षात बरच काही शिकायला मिळाले. आमच्याकडे झोमॅटोला पुढे नेण्यासाठी चांगली टीम आहे. माझ्या प्रवासात आता पर्यायी मार्ग शोधण्याची ही योग्य वेळ आहे. हे लिहीताना मी खूप भावुक आहे आणि मला आता काय वाटत आहे, हे मी शब्दात सांगू शकत नसल्याचेही त्यांनी पुढे नमूद केले आहे.
त्यांच्या योगदानाबद्दल झोमॅटोचे संस्थापक दीपिंदर गोयल यांनी ट्वीट करून आभार मानले आहेत. गौरव गुप्ता यांचे सहा वर्षे कंपनीला चांगले मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी लिहिले आहे. झोमॅटोचे सह-संस्थापक गौरव गुप्ता यांच्या राजीनाम्यानंतर कॉर्पोरेट जगतात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. स्टार्ट-अपची काही दिवसांपूर्वीच जबरदस्त लिस्टिंग झाली आहे. ही पहिली स्टार्ट-अप कंपनी आहे, ज्याने आयपीओमधून ९ हजार कोटी रुपये कमावले आहेत. गौरव गुप्ता यांनी कंपनीच्या आयपीओ प्रक्रियेदरम्यान महत्वाची भूमिका बजावली होती.