अशी आहे ममतादीदींची लाईफस्टाईल

राजकारण हा अनेकांच्या आवडीचा आणि चर्चेचा विषय आहे. त्यातही आजकाल पश्चिम बंगालचा विषय आला की तेथील राजकारण चर्चिले जाणे अपरिहार्य बनले आहे. तिसऱ्या वेळी मुख्यमंत्रीपदावर आरूढ झालेल्या फायरब्रांड नेत्या ममता बॅनर्जी यांना मुख्यमंत्रीपद टिकविण्यासाठी आमदार होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी ३० सप्टेंबर रोजी भवानीपुर मतदारसंघातून त्या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. देशभरात दीदी नावाने ओळखल्या जाणाऱ्या ममतांचा भवानीपुर हा सुरक्षित मतदारसंघ मानला जात असला तरी आताची निवडणूक त्यांना सोपी जाणार नाही असे संकेत मिळत आहेत. ही निवडणूक ममतादीदी हरल्या तर त्यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागणार आहे.

ममतादीदी लढाऊ प्रवृत्तीच्या नेत्या मानल्या जातात. त्यांच्या व्यक्तिगत जीवनाविषयी फारच थोड्या लोकांना माहिती आहे. प. बंगालची पहिली महिला मुख्यमंत्री बनण्याची कामगिरी त्यांनी करून दाखविली असली तरी त्यांचा हा प्रवास सहजसोपा नव्हता.

कनिष्ठमध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या ममताच्या डोक्यावरचे पित्याचे छत्र लहानपणीच हरपले आणि त्यामुळे लहानपणापासूनच त्यांनी आईसोबत कुटुंबाची जबाबदारी घेतली. ५ जानेवारी १९५५ ही त्यांची जन्मतारीख. त्यांनी आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही एम ए आणि त्यानंतर एलएलबीचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर राजकारणात प्रवेश केला तो कॉंग्रेस पक्षातून. पण मुळातच लढाऊ आणि आक्रमक स्वभावामुळे त्यांचे येथे पटले नाही आणि त्यांनी तृणमुल कॉंग्रेस नावाने स्वतःचा पक्ष स्थापन केला. त्यानंतरचा त्यांचा राजकीय प्रवास बहुतेकांना माहिती आहे.

ममता त्यांच्या डायट बद्दल अतिशय जागरूक असतात. मसालेदार, तेलकट पदार्थ टाळण्याकडे त्यांचा कल आहे. शिवाय फिटनेससाठी त्या रोज ४ ते ५ किमी पायी चालतात. त्यांचा पोशाख अतिशय साधा म्हणजे पांढरी, किनार असलेली सुती साडी आणि पायात स्लीपर असा असतो.

निवडणूक नामांकन अर्जात दिलेल्या माहितीनुसार ममतादिदींकडे ६९२५५ रुपये रोख, बँकेत १२,२३,५६ रुपयांच्या ठेवी आहेत. त्यांच्याकडे ९ ग्राम सोने आहे. ममतादीदी अविवाहित आहेत.