आकाशस्थ ग्रहांच्या मनोहर गाठीभेटी

अफगाणिस्तान मधील परिस्थिती मुळे जगभरातील बड्या देशांचे नेते, सल्लागार एकमेकांच्या गाठीभेटी घेत असतानाचा सप्टेंबर महिन्यात आकाशस्थ ग्रहांच्या गाठीभेटींची गर्दी उडत आहे. अर्थात या भेटी खगोल प्रेमींसाठी मेजवानी ठरणार आहेत.

१४ सप्टेंबरला सुर्यास्तानंतर रहस्यमयी आणि आपल्या सौरमंडळातील एक विशाल ग्रह नेपच्यून पृथ्वीच्या जवळ येत आहे. आपल्या ग्रहमालेतील हा एकमेव असा ग्रह आहे जो नुसत्या डोळ्यांनी पाहता येत नाही. मंगळवारी नेपच्यून पृथ्वीच्या जवळ येत असला तर तो दुर्बिणीच्या सहाय्याने पाहणे शक्य आहे. पृथ्वी आणि नेपच्यून यांच्यातील अंतर ४ अब्ज ५४ कोटी किलोमीटर असून हे अंतर १४ सप्टेंबरला २४ कोटी किमी कमी होऊन ४ अब्ज ३० किमी होणार आहे.

आपल्या सूर्यमालेतील हा तिसरा मोठा ग्रह आहे. त्याच्यावर फक्त बर्फ आहे आणि तेथील तापमान उणे २१४ डिग्री असते. नेपच्यूनला १४ चंद्र आहेत. १४ सप्टेंबरला सूर्यास्त झाल्यावर तो पूर्वेला उगवेल, मध्यरात्री डोक्यावर येईल आणि पहाटे पश्चिमेला मावळेल असे आर्यभट्ट संशोधन संस्थेचे डॉ. शशीभूषण यांनी सांगितले. ते म्हणाले नेपच्यूनवर दिवस १६ तासांचा असतो मात्र त्याचे वर्ष पृथ्वीच्या १६५ वर्षाचे असते.

१६ सप्टेंबर रोजी चंद्र आणि शनी जवळ येणार असून आकाश स्वच्छ असेल तर हे दृश्य सुंदर दिसेल. त्याचप्रमाणे १७ सप्टेंबर रोजी चंद्र आणि गुरु एकमेकांच्या जवळ येणार आहेत.