योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या ‘अब्बा जान’ या टिप्पणीवरून राजकीय वादंग सुरू


नवी दिल्ली – आगामी काळात होऊ घातलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून, आरोप-प्रत्यारोप फैरी झडू लागल्या आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या ‘अब्बा जान’ या टिप्पणीवरून आता राजकीय वादंग सुरू झाल्याचे दिसत आहे. आत यावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी टीका केली आहे.

आमच्या सरकारला हवे आहे : एक सर्वसमावेशक अफगाणिस्तान. त्यांच्या “अब्बा जान” टिप्पणीसह योगींना काय हवे आहे. एक सर्वसमावेशक यूपी किंवा विभाजित करा आणि राज्य करा? असं ट्विट कपिल सिब्बल यांनी केले आहे.

काल (रविवार) कुशीनगरमध्ये विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमांमध्ये विरोधी पक्षांवर विशेषकरून समाजवादी पार्टीवर (सपा) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निशाणा साधला आणि आरोप केला की, समाजवादी पार्टीचे सरकार गरिबांचे रेशन खाते व त्यांना मरू देते. अब्बा जान म्हणणाऱ्या एका समुदायास फायदा पोहचवत होते. गरिबांना २०१७ च्या अगोदर राशन का मिळत नव्हते? कारण तेव्हा राज्य सरकार चालवणारे आणि माफिया गरिबांचे राशन खात होते आणि लोक उपाशी मरत होते व त्यांचे राशन नेपाळ आणि बांगलादेशपर्यंत पोहचत होते. आज गरिबाचं राशन कुणीच घेऊ शकत नाही, घेतले तर तुरूंगात नक्कीच जाईल.

पुढील वर्षाच्या सुरूवातीस उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक आहे. या पार्श्वभूमीवर भाजप, काँग्रेस, सपा आणि बसपा या प्रमुख पक्षांसह अन्य पक्ष सक्रीय झाले आहेत. २०१७च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ३१२ जागांवर विजय मिळवला होता. ४०३ सदस्य संख्या असलेल्या विधानसभा निवडणुकीत ३९.६७ टक्के मते मिळवली होती, समाजवादी पार्टीला ४७, बसपाला १९ तर काँग्रेसला केवळ सात जागांवर विजय मिळवता आला होता.