वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या NEET परीक्षेतून सूट देणारे विधेयक तामिळनाडू विधानसभेत मंजूर


चेन्नई – वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षेतून (NEET)सूट देणारे विधेयक तामिळनाडूमधील सत्ताधारी डीएमकेने विधानसभेत मंजूर केले आहे. भाजप वगळता सर्वच पक्षांनी या विधेयकाला पाठिंबा दिल्यामुळे आता एमबीबीएस, बीडीएसमध्ये १२ वीच्या गुणांवर आधारित प्रवेश मिळणार आहे.

नीट परीक्षा रद्द करण्यासाठी आम्ही सत्तेवर येताच पावले उचलली. १२ वीच्या गुणांच्या आधारे वैद्यकीय शिक्षणात विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी सरकार पावले उचलत असल्याचे मुख्यमंत्री स्टालिन यांनी विधेयक मांडताना सांगितले होते. विधेयकानुसार वैद्यकीय महाविद्यालयात ज्या विद्यार्थ्याला प्रवेश घ्यायचा आहे, ते विद्यार्थी १२ वीच्या गुणांवर प्रवेश घेऊ शकतात. त्यामुळे नीट परीक्षा देण्याची आवश्यकता नसणार आहे. NEET परीक्षेत राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी सूट देण्याची मागणी या विधेयकात सरकारने राष्ट्रपतींकडे केली आहे.