स्विस बँक केंद्र सरकारला देणार भारतातील काळा पैसा खातेधारकांची तिसरी यादी


स्वित्झर्लंड : लवकरच स्विस बँकेतील धनकुबेरांची तिसरी यादी प्रसिद्ध होणार असून भारतातील काळा पैसा खातेधारकांची माहिती स्विस बँक या महिन्यात देणार असल्याची माहिती मिळत आहे. स्वित्झर्लंडमधील भारतीयांच्या मालमत्तेच्या स्थावर मालमत्तेची माहितीही पहिल्यांदाच दिली जाणार आहे. काळ्या पैशाविरोधातील लढ्यात हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

यासंदर्भात पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, ही माहिती ऑटोमॅटिक एक्सचेंज ऑफ इन्फोर्मेशन (AEOI) अंतर्गत देण्यात आली आहे. पहिल्यांदाच भारतीयांच्या मालकीच्या अचल संपत्तीचा तपशील या सेटमध्ये असेल. तसेच अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक महत्त्वाची माहिती या यादीत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर भारतीयांचे स्वित्झर्लंडमध्ये किती फ्लॅट आणि अपार्टमेंट आहेत. त्यासोबतच अशा संपत्तीवर किती कर भरायचा आहे, यासंदर्भात माहिती समोर येईल.

भारताला स्विस बँकेच्या वतीने तिसऱ्यांदा भारतीय खातेधारकांची माहिती देण्यात येईल. स्विस बँकेची तिसरी यादी म्हणजे, काळ्या पैशाविरोधातील महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. स्विस बँक पहिल्यांदाच भारतीयांच्या स्थावर मालमत्तेची माहिती भारताला देणार आहे. तज्ज्ञांच्या वतीनेही स्विस बँकेनं घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

स्विस बँकेकडून भारताला ऑटोमॅटिक एक्सचेंज ऑफ इन्फोर्मेशन (AEOI) अंतर्गत सप्टेंबर 2019 मध्ये पहिली आणि सप्टेंबरमध्ये 2020 मध्ये दुसरी यादी मिळाली होती. याच वर्षी परदेशी गुंतवणुकीची माहिती शेअर करण्याचा निर्णय स्वित्झर्लंड सरकारने घेतला होता. दरम्यान, अद्याप कोणताही निर्णय डिजिटल चलनाचा तपशील शेअर करण्याबाबत घेण्यात आलेला नाही. गेल्या दोन वर्षांमध्ये प्रत्येक वेळी स्वित्झर्लंडने जवळपास 30 लाख खातेधारकांची माहिती शेअर केली आहे. दरम्यान, या संख्येत यावेळी वाढ होण्याची शक्यता आहे.