किरीट सोमय्यांच्या १२७ कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना हसन मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर


मुंबई – आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारमधील मंत्र्यांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करणारे किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. तसेच, यासाठी २७०० पानांचे पुरावे देखील सादर केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आता त्यासंदर्भात हसन मुश्रीफ यांनी देखील पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले आहे. बिचाऱ्या किरीट सोमय्यांना काही माहिती नसावे. ते कोल्हापूरला आले असते, तर त्यांना स्पष्टपणे खरी परिस्थिती समजली असती, असे हसन मुश्रीफ म्हणाले आहेत. तसेच, येत्या दोन आठवड्यांमध्ये किरीट सोमय्यांवर १०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे देखील मुश्रीफ यांनी यावेळी नमूद केले.

कोल्हापूरमधील साखर कारखान्याविषयी किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपांना हसन मुश्रीफ यांनी यावेळी उत्तर दिले. यामध्ये हजारो शेतकऱ्यांनी पैसे गुंतवले आहेत. आमच्या कार्यकर्त्यांना आणि शेतकऱ्यांना आपला कारखाना हवा होता. त्यावेळी सरकारने सहकारी कारखान्यांची नोंदणी बंद केली होती. म्हणून हा प्रायव्हेट लिमिटेड कारखाना काढावा लागला. ज्या दिवशी आम्हाला परवाना मिळाला आणि आवाहन केले, तेव्हा एकाच दिवशी १७ कोटी रुपये जमा झाले.

लोक ४ दिवस नोटा मोजत होते. कारण सगळ्या शेतकऱ्यांना ५, १०, ५० रुपयांच्या देखील नोटा दिल्या होत्या. त्यानंतर हजारो लोकांनी पैसे दिले. त्याची देखील कोल्हापूरच्या आयकर विभागाकडून तपासणी झाली. हजारो शेतकऱ्यांची चौकशी झाली. बँकांची पासबुक देखील तपासली. त्यानंतर हे पैसे आले, असे मुश्रीफ म्हणाले.

आम्ही त्या कारखान्यासाठी भागभांडवल गोळा केले, हा कारखाना राष्ट्रीयीकृत बँकांच्या वतीने पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक, महाराष्ट्र बँक अशा अनेक बँकांच्या मदतीने उभा केला. त्याची कर्जफेड देखील झाली आहे. आता नववा हंगाम आला आहे. याची काहीही माहिती किरीट सोमय्या यांना नसल्याचे मुश्रीफ म्हणाले.

अनेक वर्ष राजकारणात, समाजकारणात आपली प्रतिमा तयार करण्यासाठी घालवावे लागतात, कष्ट करावे लागतात. पण तिला कुणीही यावे आणि डाग लावावा ही परिस्थिती आली. माझ्यावर आधी देखील असे आरोप झाले, तेव्हा मी मानहानीचे दावे ठोकले आहेत. आता हा सातवा दावा आहे. वास्तविक लोकांचा माझ्यावर विश्वास आहे, त्याला तडा जाऊ नये, यासाठी हे मी करत आहे. १७ वर्ष या राज्यात मी मंत्री आहे. माझ्यावर एक साधा आरोप झाला नाही, चौकशी झाली नाही, कुणी चर्चा केली नाही. भाजपच्या काळात चिक्की घोटाळा, मुंबईचा गृहनिर्माण घोटाळा असे घोटाळे या काळात झाले नाहीत. माझ्यावर तर कधीच आरोप झाले नसल्याचे मुश्रीफ यांनी यावेळी नमूद केले.

किरीट सोमय्यांवर येत्या २ आठवड्यांत फौजदारी अब्रू नुकसानीचा १०० कोटींचा दावा कोल्हापूरच्या सत्र न्यायालयात करत आहे. ते जेव्हा तारखेला येतील, तेव्हा त्यांनी माहिती घ्यावी. मग त्यांच्या लक्षात येईल की भाजप कोल्हापूरमधून सपाट झाला आहे. पुढील १० वर्ष देखील भाजपला स्थान नाही. चंद्रकांत पाटील यांनी देखील हायब्रिड अॅन्युइटी बांधकामात, जो भ्रष्टाचार केला आहे, त्यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन भ्रष्टाचार विरोधी पथकाकडे तक्रार करणार असल्याचे देखील हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

दरम्यान, किरीट सोमय्यांना कारखान्यासाठी ३ महिन्यांत १०० कोटी जमा करून दाखवतो, असे आव्हानच यावेळी बोलताना हसन मुश्रीफ यांनी दिले आहे. माझ्या कारखान्याचे मला एक्सपान्शन करायचे आहे. त्यासाठी १०० कोटी लागणार आहेत. कारखाना १० हजार टनांचा करायचा आहे. ५० मेगावॅट वीजनिर्मिती करायची आहे.किरीट सोमय्यांना मी सांगतो, की १५ दिवसांत लोक हाताने ५० कोटी आणून देतील. ३ महिन्यांत मी १०० कोटी जमवतो. लोकांचा एवढा विश्वास संपादन केला असल्याचे मुश्रीफ म्हणाले.

भाजपची प्रतिमा किरीट सोमय्या यांच्या अशा वक्तव्यांमुळे मलीन होत असून भाजपच्या आगामी पराभवासाठी देखील सोमय्याच जबाबदार असतील, असे मुश्रीफ म्हणाले आहेत. सोमय्यांनी अजूनही माहिती घ्यावी. पण विनाकारण भाजपची प्रतिमा मलीन होईल, असे वक्तव्य करू नये. विधानसभा निवडणुकांदरम्यान माझ्यावर छापा टाकला. पण त्यानंतर कोल्हापूरमधून भाजप साफ झाली. अलिकडच्या काळात देखील तेच घडले. जेव्हा असा त्रास दिला जातो, तेव्हा लोक चवताळून उठतात. भाजपच्या आगामी पराभवाला देखील किरीट सोमय्या हेच जबाबदार ठरतील. पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार येईल, तेव्हा मी स्वत: किरीट सोमय्यांना हार घालीन, असे मुश्रीफ म्हणाले आहेत.