अर्थमंत्री निर्मला सीतारमण सीतारमण यांची ‘इन्फोसिस’-‘पांचजन्य’ वादात उडी


नवी दिल्ली – देशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असणाऱ्या ‘इन्फोसिस’ विरुद्ध ‘पांचजन्य’ वादात अर्थमंत्री निर्मला सीतारमण सीतारमण यांनी उडी घेतली आहे. विशेष म्हणजे निर्मला सीतारमण सीतारमन यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थक मुखपत्र असणाऱ्या ‘पांचजन्य’ची बाजू न घेता इन्फोसिसची बाजू घेत एवढ्या मोठ्या कंपनीला देशद्रोही म्हणणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. इन्फोसिस संदर्भात पांचजन्यमध्ये छापून आलेल्या वादग्रस्त लेखासंदर्भात निर्मला सीतारमण यांनी हे मत व्यक्त केले आहे. पांचजन्यमधून हे गंभीर आरोप वस्तू व सेवाकर (जीएसटी) आणि प्राप्ती कर पोर्टलमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणींच्या अनुषंगाने टीका करताना करण्यात आले होते.

सीएनएन-न्यूज १८ शी बोलताना निर्मला सीतारमण यांनी, ते वक्तव्य योग्य नव्हते. अशाप्रकारचे वक्तव्य करण्याची काहीच गरज नव्हती. हे चांगलेच झाले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या वक्तव्याशी आपला काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. ते वक्तव्य फारच चुकीचे होते, असे मत व्यक्त केले आहे. तसेच निर्मला सीतारमण यांनी पुढे बोलताना स्वत: इन्फोसिसबरोबर प्रत्यक्षात या नवीन पोर्टलसंदर्भात काम करत होत्या. त्यांनी सरकार आणि इन्फोसिस एकत्र काम करत असल्याची माहिती दिली. मी स्वत: दोन वेळा त्यांना फोन केला आणि नंदन निलेकणी यांचे या समस्येकडे लक्ष वेधले असल्याचे निर्मला सीतारमण म्हणाल्या.

इन्फोसिस त्यांनी दिलेल्या शब्दानुसार प्रोडक्ट तयार करेल, असा मला विश्वास आहे. यामध्ये थोडा विलंब नक्की झाला, ज्यामुळे आम्हाला फटका बसला. हे नवीन पोर्टल आम्ही फार अपेक्षेने आणलं आहे. यामध्ये थोडा गोंधळ आहे आणि आम्ही एकत्र काम करुन हा गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. मला विश्वास आहे इन्फोसिस हा गोंधळ लवकरच सोडवेल, असेही निर्मला सीतारमण यांनी म्हटले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थक ‘पांचजन्य’ या साप्ताहिकामध्ये ‘इन्फोसिस’ कंपनीच्या माध्यमातून एखादी देशविरोधी शक्ती देशाच्या आर्थिक हिताविरोधात तर काम करीत नाही ना, अशी शंका व्यक्त करण्यात आली होती. ‘इन्फोसिस’ने अनेकदा नक्षलवादी, डावे यांना मदत केल्याचे आरोप आहेत, पण त्याचे पुरावे आमच्याकडे नसल्याचेही ‘पांचजन्य’मधील लेखात म्हटले होते. वस्तू व सेवाकर (जीएसटी) आणि प्राप्ती कर पोर्टलमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणींच्या अनुषंगाने ही टीका करण्यात आली आहे.

इन्फोसिस या अव्वल भारतीय तंत्रज्ञान कंपनीने ही दोन्ही पोर्टल तयार केली आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेला मुद्दामहून अस्थिर करण्याचा हा प्रयत्न असू शकतो, असा आरोप पांचजन्यच्या ताज्या अंकात करण्यात आलेला. ‘साख और आघात’ या मुखपृष्ठ लेखात ही टीका करण्यात आली असून मुखपृष्ठावर इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे छायाचित्रही प्रसिद्ध केले आहे. उँची उडान, फिका पकवान, अशी टीकाही या लेखात करण्यात आली आहे.

‘इन्फोसिस’ने तयार केलेल्या या दोन पोर्टलमध्ये नेहमी तांत्रिक अडचणी येतात. त्यामुळे करदाते व गुंतवणूकदार यांची गैरसोय होते, असे नमूद करून या लेखात म्हटले आहे, की अशा बाबींमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवरचा करदात्यांचा विश्वास कमी होतो. सरकारी संस्था महत्त्वाची संकेतस्थळे आणि पोर्टलची कंत्राटे इन्फोसिसला देताना मागेपुढे पाहत नाहीत, कारण ती एक नामवंत सॉफ्टवेअर कंपनी आहे.

इन्फोसिसने जीएसटी आणि प्राप्तिकर विवरण पत्रे यांची पोर्टल्स विकसित केली आहेत. करदात्यांचा भारतीय अर्थव्यवस्थेवरचा विश्वास कमी होण्यास यामुळे मदतच होत आहे. भारतीय आर्थिक हिताविरोधात इन्फोसिसच्या माध्यमातून कुणी देशविरोधी शक्ती तर काम करीत नाहीत ना अशी शंका लेखात व्यक्त केली आहे. इन्फोसिसने अनेकदा नक्षलवादी, डावे, तुकडे-तुकडे टोळी यांना मदत केल्याचे आरोप आहेत, पण त्याचे पुरावे आमच्याकडे नाहीत. इन्फोसिस ही कंपनी परदेशी ग्राहकांना अशीच वाईट सेवा देते का, असा सवालही लेखात करण्यात आला होता.

दरम्यान पांचजन्यचे संपादक हितेश शंकर यांनी सांगितले, की इन्फोसिस ही मोठी संस्था आहे. या कंपनीला सरकारने विश्वासार्हतेच्या आधारावर महत्त्वाची कामे दिली आहेत. दरम्यान, हा लेखच देशविरोधी असल्याची टीका काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी ‘ट्विट’द्वारे केली होती. बदनामीकारक टीका ‘इन्फोसिस’वर करण्यात आली असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या साप्ताहिकाने केलेले लिखाण उद्वेकजनक आणि देशविरोधी आहे. इन्फोसिससारख्या कंपन्यांनीच जगात भारताला स्थान मिळवून दिले असल्याचेही रमेश यांनी म्हटले होते.

पण लेखावरुन प्रंचड वाद झाल्यानंतर या लेखाचा संघाशी संबंध जोडू नये, असे संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी स्पष्ट केले होते. पण या लेखावरून काँग्रेसने संघाला लक्ष्य केल्याचे पहायला मिळाले. एक भारतीय कंपनी म्हणून ‘इन्फोसिस’चे देशाच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान आहे. ‘इन्फोसिस’ने तयार केलेल्या वेब पोर्टलशी संबंधित काही मुद्दे असू शकतात, पण ‘पांचजन्य’ मध्ये या संदर्भात, जो लेख प्रकाशित झाला आहे, ती त्या लेखकाची व्यक्तिगत मते असल्याचे आंबेकर यांनी स्पष्ट केले आहे. तसेच ‘पांचजन्य’ हे संघाचे मुखपत्र नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. प्राप्तिकर किंवा जीएसटी पोर्टलमध्ये काही अडचणी असू शकतात, पण संघ हे त्याबाबत चर्चा करण्यासाठी व्यासपीठ नाही, असे संघाच्या एका पदाधिकाऱ्याने नमूद केले. या पूर्वीही संघाने ‘पांचजन्य’ हे आपले मुखपत्र नसल्याचे असे स्पष्ट केले होते.

देशाचा विकास आणि प्रगतीमध्ये मोठे योगदान असलेल्या इन्फोसिस कंपनीविरोधात पुराव्याअभावी बेफाम आरोप करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘पांचजन्य’ या मुखपत्राविरोधात कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने केली होती. ‘इन्फोसिस’चे नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांचे देशासाठी मोठे योगदान असल्याचे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले होते.