नीरज चोप्राने आईवडिलांना घडविली विमानाची सफर

टोक्यो ऑलिम्पिक मध्ये भारताला भालाफेक प्रकारात पहिले ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राचे नवे ट्विट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले आहे. नीरजच्या या ट्विट आणि फोटोला अल्पावधीत लाखो लाईक मिळाले आहेतच पण नीरजच्या साधेपणावर चाहते फिदा झाले आहेत.

ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर नीरजने त्याच्या आईवडिलांबरोबर विमानात बसलेला फोटो शेअर केला आहे. त्याखाली नीरजने आयुष्यातील एक स्वप्न पूर्ण झाले असे म्हटले आहे. आपल्या आईवडिलांना विमानाची सफर घडवून आणण्याचे स्वप्न नीरजने पहिले होते आणि त्यानुसार त्याने आईवडिलांना प्रथमच विमान प्रवास घडविला आहे.

नीरज म्हणतो, तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाबद्दल आभारी आहे. नीरजच्या या पोस्टला १ लाख ३७ हजार लाईक मिळाले आहेत. नीरजचा बंगलोर येथे सत्कार होणार आहे. त्यासाठी नीरज, त्याची आई सरोजादेवी आणि वडील सतीश चोप्रा यांनी दिल्ली ते बंगलोर असा विमान प्रवास केला आहे. अर्थात लोकांचे हृदय जिंकून घेण्याची नीरजची ही पहिली वेळ नाही. टोक्यो मध्ये गोल्ड मेडल जिंकल्यावर त्याचे लाखो फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. तेव्हाही त्याच्या साधेपणाचे खूप कौतुक झाले आहे.