अफगाणिस्थान राष्ट्रपती आणि मंत्र्यांचे इतके आहेत पगार

तालिबानने अफगाणिस्थान मध्ये सरकार स्थापन केले असून पंतप्रधानपदी मोहम्मद हसन अखुंद यांची नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर ३३ सदस्यांचे मंत्रिमंडळ स्थापन केले जात आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या तालिबान सरकार मधील पंतप्रधान, मंत्री आणि इतर प्रमुख सदस्य किती पगार घेतील याची अनेकांना उत्सुकता आहे. अर्थात या संदर्भात अजून कोणतीही घोषणा झालेली नसली तरी मागच्या सरकार वरून त्याचा अंदाज बांधला जात आहे. मागच्या सरकारमध्ये प्रमुख पद राष्ट्रपती हे होते. अशरफ गनी देशाचे राष्ट्रपती होते आणि त्यांचा पगार होता महिना १३४०० डॉलर्स. म्हणजे ११.५ लाख रुपये. भारताच्या राष्ट्रपतीच्या तुलनेत हा पगार खूपच जास्त होता. भारताच्या राष्ट्रपतींचा पगार आहे महिना ५ लाख रुपये.

भारताच्या तुलनेत अफगाणिस्थानचे मंत्री आणि सरकारी अधिकारी यांचे पगार जास्तच होते. शिवाय भारताच्या तुलनेत अफगाणिस्थान मध्ये खाणे पिणे खर्च स्वस्त होता. अशरफ गनी  २०१४ पासून राष्ट्रपती होते आणि आशियातील सर्वाधिक पगार व सुखसुविधा घेणारे म्हणून ओळखले जात होते. तालिबानी आल्यावर त्यांनी देश सोडून पलायन केले आहे. असे म्हणतात की तालिबानी पंतप्रधान अखुंद महिना १० ते ११ लाख रुपये पगार घेतील.

अफगाणिस्थानचे माजी उपराष्ट्रपती सालाह याना महिना ९ लाख ६० हजार वेतन होते. तालिबान सरकार मध्ये दोन उपपंतप्रधान आहेत. त्यांना ८ लाख १९ हजार रुपये वेतन दिले जाणार आहे. अफगाणिस्थानच्या वरिष्ठ सभागृहात १०२ तर कनिष्ठ सभागृहात २५० सदस्य आहेत. त्यांना सरासरी दीड लाख रुपये पगार दिला जात होता. तसाच पगार तालिबानी सदस्यांना दिला जाईल असे मानले जात आहे.