जाणून घ्या काय असते  X, Y, Z आणि Z+ दर्जाची सुरक्षा


केंद्रीय गृह मंत्रालयाने नेत्यांना देण्यात येणाऱ्या सुरक्षेची समीक्षा केली असून, काही नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव, बिहारमधील खासदार राजीव प्रताप रूडी यांची सुरक्षा काढण्यात आली आहे. तसेच, बिहारमधील लोक जनशक्ती पार्टीचे खासदार चिराग पासवान यांच्या सुरक्षेत असलेल्या सीआरपीएफ जवानांना परत बोलवण्यात आले आहे. त्यांच्या सुरक्षा श्रेणीमध्ये बदल करण्यात आला असून, त्यांना वाय दर्जाची सुरक्षा आता देण्यात येणार आहे. त्याचबरोबर, बहुजन समाज पार्टीचे राज्यसभा राज्यसभा खासदार सतीश चंद्र मिश्र यांचे नाव केद्रीय सुरक्षा यादीतून काढण्यात आले असून, त्यांना केवळ उत्तर प्रदेशमध्ये झेड दर्जाची सुरक्षा देण्यात येणार आहे. याआधी त्यांना दिल्ली आणि उत्तरप्रदेशमध्ये सुरक्षा देण्यात येत होती. काय असतो सुरक्षा दर्जा ते जाणून घेऊया.

भारतामध्ये सुरक्षेचा दर्जा हा धोक्याच्या स्तराबरोबर प्रतिष्ठेची गोष्ट देखील समजली जाते. आयबीच्या शिफारसीनंतर प्रत्येक वर्षी विशिष्ट लोकांच्या सुरक्षेची समीक्षा केली जाते. त्यानंतर धोक्याचा स्तर बघून विशिष्ट दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात येत असते.

एसपीजी सुरक्षा –
भारतामध्ये पंतप्रधान, उपपंतप्रधान आणि गांधी कुटूंबला एसपीजी सुरक्षा प्राप्त आहे. हा सुरक्षेचा सर्वात उच्च दर्जा आहे. यामध्ये असलेल्या कमोंडोकडे अत्याधुनिक हत्यार आणि संचार उपकरण असतात.

झेड प्लस सुरक्षा  –
स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपच्या सुरक्षेनंतर झेड प्लस भारतातील उच्च सुरक्षेचा दर्जा आहे. या श्रेणीमधील व्यक्तीच्या सुरक्षेसाठी 36 जवान तैनात असतात. ज्यामध्ये 10 पेक्षा अधिक एनएसजी कमांडोबरोबरच दिल्ली पोलिस, आयटीबीपी अथवा सीआरपीएफचे जवान आणि राज्यातील पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश असतो. सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या एनएसजी जवानांकडे  एमपी 5 मशीनगन असते. त्याचबरोबर त्यांच्या ताफ्यात एक जॅमर असलेली गाडी देखील असते. जे मोबाईल सिग्नल जाम करण्याचे काम करते. देशात मोजक्याच लोकांना झेड प्लस सुरक्षा देण्यात येत असते.

झेड सुरक्षा –
झेड दर्जाच्या सुरक्षेमध्ये चार ते पाच एनएसजी जवानांबरोबरच एकूण 22 सुरक्षागार्ड असतात. यामध्ये दिल्ली पोलिस, आयटीबीपी अथवा सीआरपीएफचे जवान आणि स्थानिक पोलिसांचा समावेश असतो.

वाय दर्जाची सुरक्षा –
हा सुरक्षेचा तिसरा स्तर आहे. कमी धोका असणाऱ्या लोकांना ही सुरक्षा दिली जाते. यामध्ये एकूण 11 सुरक्षा जवान असतात. त्यामध्ये दोन पीएसओ (खाजगी सुरक्षारक्षक) देखील असतात. यामध्ये कोणत्याही जवानाचा समावेश नसतो. भारतामध्ये सर्वात अधिक वाय दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात येत असते.

एक्स दर्जाची सुरक्षा –
या दर्जाच्या सुरक्षेत दोन सुरक्षागार्ड असतात. ज्यामध्ये एक पीएसओ असतो. भारतामध्ये अनेक लोकांना एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आलेली आहे.

Leave a Comment