अजब अंगठीची गजब कहाणी


जगात आश्चर्यकारक गोष्टींची वानवा नाही. यात एका अंगठीची कहाणी खरोखर अजब म्हणावी लागेल. ही अजब कहाणी सुरु झाली १९ एप्रिल १७५९ मध्ये. या दिवशी महान अभिनेता आणि नाटककार ऑगस्ट विलहेन इफलँड या जर्मन कलाकाराचा जन्म झाला होता. त्याचेच नाव या अंगठीला दिले गेले म्हणून ही गोष्ट तेव्हापासून सुरु होते. असे मानतात कि ज्याला ही अंगठी मिळते ती त्याच्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. कधीकाळी ही अंगठी लोक शौक म्हणून वापरत पण आज मात्र ती बक्षीस म्हणून दिली जाते ती जर्मनीतील गुणी अभिनेते नाटकातील महान अदाकार यांना. या अंगठीत छोटे हिरे जडविले गेले आहेत आणि त्यात इफलँडची छबी आहे.

ही अंगठी मिळविणारा कलाकार तिचा पुढचा वारस कोण असेल त्याची निवड करतो पण या अंगठीचा पुढचा मालक कोण त्याचे नाव सध्या ज्याच्याकडे ती अंगठी असेल त्याच्या मृत्युनंतर उघड होते. ज्याला हि अंगठी देऊन सन्मान केला गेले आहे तो अंगठीचा मालक पुढच्या तिच्या वारसाचे नाव लिहून तो कागद तिजोरीत सुरक्षित ठेवतो. या तिजोरीची सुरक्षा कडक असते. अंगठीच्या मालकाच्या मृत्यू झाला कि तिजोरी प्रतिष्ठित, सन्माननीय व्यक्तींच्या उपस्थितीत उघडून पुढचा वारस कोण त्याच्या नावाची घोषणा केली जाते.


या अंगठीचा मूळ इतिहास स्पष्ट नाही. प्रसिद्ध लेखक जोहान वूल्फगँग वॉन गोएथने ऑगस्ट विल्हेम इफलँडला ती दिली होती असे सांगतात. आत्तापर्यंत या अंगठीचे ९ मालक झाले आहेत. सध्या ती जर्मनीतील महान थियेटर कलाकार जेन्स हार्जर याच्याकडे आहे. १९११ मध्ये या अंगठीचा मालक आल्फ्रेड बॅसमन होता आणि तेव्हापासून या अंगठीला शाप असल्याचे सांगितले जाऊ लागले.

त्याचे असे झाले कि आल्फ्रेडकडे ही अंगठी आल्यावर त्याने त्याने तिचा पुढचा वारस निवडला पण त्या वारसाचा अगोदरच मृत्यू ओढवला. त्यानंतर आल्फ्रेडने आणखी तीन वेळा वारस निवडला पण या तिघांचाही अगोदरच मृत्यू झाला. या प्रकारामुळे आल्फ्रेडची अशी समजूत झाली कि ही अंगठी शापित असावी. त्यामुळे त्याने ही अंगठी त्याने जो शेवटचा वारस निवडला होता त्याच्या शवाबरोबर दफन करण्याचे ठरविले होते. पण प्ले हाउस बर्थ थियेटरचा दिग्दर्शक सावध झाला आणि त्याने ही अंगठी दफन होण्यापासून वाचविली.


१९५२ मध्ये बॅसमनचा मृत्यू झाला तेव्हा या अंगठीला वारस नव्हता. दोन वर्षे तिच्यावर कुणाचेच नाव लिहिले गेले नाही. १९५४ मध्ये जर्मन अभिनेता वार्नस क्राउसला ही अंगठी दिली गेली. नंतर ती जोसेफ मिनरॅड कडे आली. १९९६ ते २०१९ हा काळ ती ब्रुनो गँज याच्याकडे होती आणि आता ती जेन्स हार्जर याच्याकडे आहे.

Leave a Comment