कृषी वैज्ञानिकांनी जांभळाची एक नवी जात २० वर्षाच्या प्रदीर्घ संशोधनातून विकसित केली असून त्याला जामवंत असे नाव दिले आहे. जांभळाचे हे नवे वाण मधुमेहावर प्रभावी आहे तसेच अनेक अँटीऑक्सिडंट गुणांनी परिपूर्ण आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेशी संलग्न लखनौच्या केंद्रीय उपोष्ण बागवानी संस्थेतील संशोधकांनी ही जात विकसित करण्यासाठी सतत संशोधन केले असे समजते.
मधुमेहावर प्रभावी ठरणार जांभळाचे नवे वाण
हा नव्या वाणातील जांभळाची बी अगदी छोटी असून गराचे फळातील प्रमाण ९० ते ९२ टक्के आहे. जांभळाच्या या वाणांची झाडे नेहमीच्या जांभूळ वृक्षापेक्षा उंचीला कमी आणि दाट फांद्या असलेली आहेत. फळाचा रंग गडद जांभळा आहे. संस्थेचे प्रमुख संशोधक डॉ. आनंदकुमार म्हणाले, या जांभळात अँटीडायबेटिक तसेच अँटीऑक्सिडंट तत्वे भरपूर प्रमाणात आहेत. मे ते जुलै असा यांचा उत्पादन काळ असून फळांचा आकार मोठा आहे आणि रंग अत्यंत आकर्षक आहे. जांभळाचे सरासरी वजन २४ ग्रॅम असून याचे व्यावसायिक पातळीवर सुद्धा उत्पादन घेता येईल. जे शेतकरी हे उत्पादन घेतील त्यांना कमाईचे नवे साधन यामुळे मिळणार आहे.
देशाच्या विविध भौगोलिक भागात या जांभळाचे उत्पादन आणि गुणवत्ता तपासली गेली असून देशात अनेक ठिकाणी त्याचे उत्पादन घेता येणे शक्य आहे. संस्थेकडे जांभळाच्या उत्तम वाणांचा मोठा संग्रह आहे असेही डॉ. आनंदकुमार यांनी सांगितले.