जावेद अख्तर यांनी तालिबान्यांचे समर्थन करणाऱ्या देशांना फटकारले


तालिबानला सत्ता स्थापन करण्यासाठी समर्थन दर्शवणाऱ्या देशांवर प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी निशाणा साधला आहे. तालिबानसोबत हस्तांदोलन करण्यास तथाकथित सुसंस्कृत आणि लोकशाही असलेले हे देश तयार आहेत, ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याचे ते म्हणाले आहेत. तालिबानला जगातील प्रत्येक लोकशाही सरकारने मान्यता देण्यास नकार दिला पाहिजे, असे जावेद अख्तर म्हणाले. तसेच अफगाणिस्तानात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल तालिबानचा निषेध केला पाहिजे, असे जावेद अख्तर आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

आपल्या ट्वीटमध्ये जावेद अख्तर म्हणाले, तालिबान्यांना मान्यता देण्यास प्रत्येक सभ्य व्यक्तीने, प्रत्येक लोकशाही सरकारने तसेच जगातील प्रत्येक सुसंस्कृत समाजाने नकार द्यायला हवा. तसेच अफगाणिस्तानात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करणे गरजेचे आहे. अन्यथा न्याय, मानवता आणि विवेक हे शब्द विसरून जा, असे म्हणत जावेद अख्तर यांनी परखड मत व्यक्त केले आहे.

आपल्या पुढील ट्वीटमध्ये जावेद अख्तर यांनी तालिबानचे प्रवक्ता सैयद जकीरुल्लाह यांनी महिलांबद्दल केलेल्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे. ट्वीटमध्ये ते म्हणाले, जगाला तालिबानच्या प्रवक्त्याने सांगितले आहे की महिला या मंत्री बनण्यासाठी नव्हे, तर घरी राहून मुले जन्माला घालण्यासाठी असतात. पण तरीही तालिबानशी हात मिळवणी करण्यासाठी जगातील तथाकथित सुसंस्कृत आणि लोकशाही देश तयार आहेत. ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याचे जावेद अख्तर म्हणाले आहेत.