नितेश राणेंनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना कोविड योद्ध्यांच्या प्रश्नांबद्दल विचारला जाब


मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजप आमदार नितेश राणे यांनी पत्र लिहिले असून मुख्यमंत्र्यांना या पत्राद्वारे त्यांनी कोविड योद्ध्यांच्या प्रश्नांबद्दल जाब विचारला असून अनेक सवालही उपस्थित केले आहेत. जेव्हा मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा सुरु केला, तेव्हा ‘आम्ही करुन दाखवले’ असे म्हणत श्रेय घेतले, मग हा विमा आता बंद पडला आहे, त्याचे श्रेय कुणाला द्यायचे, असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.

नितेश राणे आपल्या पत्रात म्हणतात, कोविडमधील आपल्या कामगिरीबाबत स्वतःच्याच कौतुकाचे पोवाडे आपले सरकार गातात आणि एवढेच नाही तर आपल्या सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार कोविड काळातील कामगिरीसाठी ‘सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट अवार्ड’ प्राप्त करून घेतात. पण जे खरे कोविड वॉरिअर म्हणजे जे महानगरपालिकेचे कर्मचारी आपल्या जीवाची आणि आपल्या कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता तत्परतेने कर्तव्यासाठी घराबाहेर पडतात. आपण अशा कर्मचाऱ्यांसाठी काय करत आहात? आपल्या हस्ते सुरू करण्यात आलेली गटविमा योजना पूर्णपणे बंद पाडण्यात आली आहे. हे आपणास माहित नाही का?”

राणे पुढे म्हणतात, ही योजना जेव्हा सुरु केली, तेव्हा याचे श्रेय आपण व आपल्या पक्षाने घेतले होते. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना आम्ही पाच लाखांपर्यंतच्या विम्याचे कवच दिले, अशाप्रकारच्या बातम्या वृत्तपत्रातून तसेच इतर माध्यमातून प्रकाशित केल्या. मग ही योजना जेव्हा बंद झाली आहे, तेव्हा याचे श्रेय कुणाला द्यायचे? आपण आणि आपला महापालिकेतील सत्ताधारी पक्ष जसे करून दाखवलेचे श्रेय घेतात, तसेच श्रेय बंद करून दाखवले याचेही घेणार का?

त्याचबरोबर नितेश राणे यांनी आपल्या पत्रात आपल्याला हस्ते शुभारंभ केलेली योजना आपल्यालाच सत्ताधारी पक्षाच्या उदासिनतेमुळे बंद झाली, असा आरोपही केला आहे. ही योजना जर पुन्हा कार्यान्वित करण्याची मानसिकता नसेल, किंबहुना या योजनेचा लाभ कायमचा बंद करण्याचा निर्णय आपल्यालाच सत्ताधारी पक्षाने घेतला असेल, तर त्याप्रकारे त्याची जाहीर घोषणा करून टाकावी. जेणेकरून कर्मचारी स्वत: विमा काढतील. पण त्यांच्या भावनांशी आणि त्यांच्या परिवारच्या भविष्याशी सत्ताधारी पक्षाने स्वताच्या अर्थकारणासाठी खेळू नये, असेही ते आपल्या पत्रात म्हणाले आहेत.