ऑलिम्पिकमधील पराभवाची जोकोव्हिचने केली परतफेड


वॉशिंग्टन – अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान असलेला सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिचने प्रवेश केला आहे. टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता जर्मनीचा अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेव्हचा उपांत्य फेरीत नोव्हाक जोकोव्हिचने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. सुरुवातीला पिछाडीवर असणाऱ्या नोव्हाक जोकोव्हिचने जबरदस्त पुनरागम करत ४-६, ६-२, ६-४, ४-६, ६-२ ने अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेव्हचा पराभव करत गोल्डन ग्रँड स्लॅम जिंकण्याच्या आपल्या स्वप्नाकडे पाऊल टाकले आहे.

त्याचबरोबर ऑलिम्पिक २०२० मधील आपल्या पराभवाचा वचपादेखील नोव्हाक जोकोव्हिचने काढला आहे. नोव्हाक जोकोव्हिचचे गोल्डन ग्रँड स्लॅमचे स्वप्न अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेव्हनेच मोडले होते. रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीच्या सामन्यात नोव्हाक जोकोव्हिचसमोर रशियाचा दुसरा मानांकित डॅनिल मेदवेदेवचे आव्हान असणार आहे.

झ्वेरेव्हने ऑगस्टमध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमधील उपांत्य फेरीतच जोकोव्हिचवर सनसनाटी विजयाची नोंद करून त्याचे ‘गोल्डन स्लॅम’चे स्वप्न उद्ध्वस्त केले होते. जोकोव्हिचला या धक्क्यातून सावरणे कठीण गेले आणि कांस्यपदकाच्या लढतीतही तो पराभूत झाला. त्यामुळे आता जोकोव्हिचला ‘कॅलेंडर स्लॅम’पासूनही दूर ठेवण्यात झ्वेरेव्ह यशस्वी होणार का, याकडे अवघ्या टेनिसविश्वाचे लक्ष लागले होते.