मुख्यमंत्र्यांचे साकीनाका बलात्कार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्याचे आदेश


मुंबई – उपचारांदरम्यान मुंबईच्या साकीनाका परिसरामध्ये झालेल्या बलात्कार घटनेतील पीडितेचा मृत्यू झाला आहे. आरोपीने साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार करुन गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानवीय प्रकार समोर आला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात या महिलेचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत फास्ट ट्रॅकवर हा खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. दरम्यान, मुंबईतील न्यायालयाने आरोपी मोहन चौहानला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणे हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील यासंदर्भात बोललो आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

या घटनेविषयी मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण माहिती घेतली असून त्यांनी यासंदर्भात पोलीस आयुक्तांशी चर्चा केली आहे. झालेली घटना निंदनीय असून हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच या प्रकरणी तातडीने तपासाला गती देण्याचे निर्देश देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.