उत्तराखंड हादरले, 4.6 रिश्टर स्केल भूकंपाचे झटके


डेहरादुन – आज सकाळी भूकंपाच्या धक्क्यांनी देवभूमी उत्तराखंड हादरुन गेले. सकाळच्या सुमारास जोशीमठपासून 31 किलोमीटर अंतरावर आलेल्या भूकंपाच्या धक्क्याने नागरिक घाबरुन गेले. भूकंपाचे झटके जाणवताच लोक घराच्या बाहेर पडले. कुठल्याही प्रकारचे नुकसान या भूकंपामुळे झालेले नसल्याची माहिती मिळाली आहे, पण भूकंपाचे झटके खूप मोठ्या प्रमाणात होते, अशीही माहिती आहे.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या माहितीनुसार 4.6 रिश्टर स्केल एवढी या भूकंपाची तीव्रता होती. आज पहाटे 5.58 वाजता उत्तराखंडच्या जोशीमठपासून 31 किलोमीटर अंतरावर पश्चिम दक्षिण पश्चिममध्ये हा भूकंप झाल्याची माहिती आहे. आजूबाजूच्या राज्यालाही या भूकंपाचे हलके धक्के बसल्याची माहिती आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये गुरुवारी भूकंप झाला होता. या भूकंपाचे केंद्र चंबा जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाली आहे. जमिनीच्या आत पाच किलोमीटरवर हा भूकंप झाला होता, ज्याची तीव्रता 3.6 रिश्टर स्केल एवढी होती.