… तर लालबागमध्ये पुन्हा १४४ कलम लागू करणार – विश्वास नांगरे पाटील


मुंबई – जगभरासह देशातील कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईच्या ‘लालबागचा राजा’च्या प्राणप्रतिष्ठेच्या पूजेला विलंब झाल्याची माहिती मिळत असून कडेकोट पोलीस बंदोबस्त मंडळाच्या परिसरात तैनात केला आहे. या ठिकाणी मुंबईचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटीलही दाखल झाले आहेत. साधारण तासभर मंडळ पदाधिकाऱ्यांसोबत चाललेल्या या बैठकीनंतर अखेर विश्वास नांगरे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

याबाबत माहिती देताना माध्यमांना नांगरे पाटील यांनी सांगितले की, मुंबई पोलिसांनी कलम १४४ खाली दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. पण, मंडळाशी चर्चा केल्यानंतर असे ठरले आहे की, दुकानात फक्त दोन जणांना मंडळ आणि मुंबई पोलिसांकडून पास दिला जाईल. आरतीलाही फक्त १० लोकांना परवानगी असेल. या नियमांचा जर भंग झाला तर पुन्हा कलम १४४ चे आदेश लागू करण्यात येतील. कोणत्याही प्रकारचे मुखदर्शन भाविकांना घेता येणार नाही. पण, ऑनलाईन दर्शन सुरू आहे.

स्थानिक नागरिक मुंबई पोलिसांच्या अतिसुरक्षेमुळे त्रस्त झाले आहेत. परिसरातील दुकानेही बंद ठेवण्यात आली असून नागरिकांच्या घरी येण्याजाण्याच्या रस्त्यावरही पोलीस बंदोबस्त तैनात आहे. लालबागच्या राजाची स्थापना करणारे स्थानिक व्यापारी आणि दुकानदारांना पोलिसांनी नोटीस पाठवून त्यांची दुकाने बंद केल्यामुळे लालबाग मार्केटमधील स्थानिक रहिवासी प्रचंड नाराज होते. पण यावर आता पोलिसांनी तोडगा काढला आहे. लालबागच्या राजाच्या प्रत्यक्ष दर्शनाला पोलिसांनी बंदी घातल्यामुळे बाहेरून कोणी भाविक लालबागमध्ये येणार नाही.

पोलिसांनी साधारण तासभर लालबागचा राजा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. आरतीच्या वेळी गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे. तर सर्व नियमांचे पालन करण्याचे आश्वासन मंडळांनेही दिल्यामुळे पोलीस आणि मंडळांच्या समन्वयाने हा प्रश्न सुटला आहे.