इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्यासाठी पुन्हा मुदत वाढ


नवी दिल्ली – इन्कम टॅक्स रिटर्न (प्राप्तिकर विवरण) दाखल करण्याला पुन्हा एकदा मुदत वाढ देण्यात आली आहे. ३१ डिसेंबरपर्यंत ही मुदत वाढवण्यात आली आहे. मुदत वाढवण्याची ही दुसरी वेळ असून याआधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. नव्या प्राप्तिकर ई-फायलिंग पोर्टलवर करदात्यांना तांत्रिक त्रुटी जाणवत असल्यामुळे ही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.

यासंदर्भातील माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने ट्वीट करत दिली आहे. २०२१-२२ या निर्धारित वर्षासाठी इन्कम टॅक्स रिटर्न तसेच निरनिराळे लेखा अहवाल सादर करण्यात अडचणी येत असल्याचे करदाते व इतर संबंधितांनी कळवल्यामुळे ही मुदत वाढवण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.

दरम्यान ३० ऑक्टोबरपर्यंत लेखा अहवाल सादर करण्याची मुदत वाढवण्यात आली होती. त्यातही १५ जानेवारी २०२२ पर्यंत वाढ करण्याची आल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. नव्या ई-फायलिंग पोर्टलचे www.incometax.gov.in ७ जूनला लाँचिंग झाले होते. पण करदात्यांना सुरुवातीपासूनच तांत्रिक त्रुटी आणि इतर अडचणींचा सामना करावा लागला होता. ट्वीटवर करदात्यांकडून येणाऱ्या तक्रारींची अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी दखल घेतल पोर्टलची निर्मिती करणाऱ्या इन्फोसिसला खडे बोल सुनावले होते. याशिवाय सीईओ सलील पारेख यांना २३ ऑगस्टला समन्सदेखील बजावले होते.