राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार निवडीच्या प्रचलित निकषांमध्ये सुधारणा प्रस्तावित


मुंबई : राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार निवडीच्या प्रचलित निकषांमध्ये सुधारणा करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. लवकरच त्याबाबतचा निर्णय घेऊन राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार निवडीबाबतची कार्यवाही करण्यात येईल. असा खुलासा शालेय शिक्षण विभागाने केला आहे.

सध्या २१ जुलै, २०१६ च्या शासन निर्णयातील निकषांनुसार राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान केले जातात. कोरोनाकाळात शाळा बंद असल्याकारणाने सध्याच्या निकषांमधील बऱ्याचशा घटकांवर शिक्षकांचे गुणांकन करणे शक्य नव्हते, असे शिक्षण विभागामार्फत नमूद करण्यात आले आहे.

सन २०१८-१९ राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार २२/०८/२०१९ च्या शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आले असून एकूण १०७ शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले.

राज्य आदर्श शिक्षण पुरस्कारासाठी शिक्षक निवडीची प्रक्रिया दरवर्षी साधारण जुलै महिन्यात सुरू होते. परंतु सन २०२० मध्ये मार्च महिन्यापासूनच कोरोना महामारीच्या संकटामुळे राज्यातील संपूर्ण शिक्षण व्यवस्था ठप्प झाली होती. त्यामुळे सन २०१९-२० साठीच्या पुरस्कारासाठी शिक्षक निवडीची प्रक्रिया वेळेत सुरू करणे शक्य झाले नाही, असे शिक्षण विभागाचे सहसचिव यांनी कळविले आहे.